निवडणूक जाहीर होताच तिकीट वाटपासाठी किंवा नंतर अनेक नेत्यांची पक्षांतरे पहायला मिळत होती. परंतू, मतदानाला काही मोजके दिवस शिल्लक असताना देखील नेत्यांची पक्षांतरे सुरुच आहेत. दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण बिराजदार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
पाटील यांचा अचानक ठाकरे गटात प्रवेश करणे हा भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांना मोठा धक्का आहे. पाटील हे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत. दक्षिण सोलापूरमध्ये लिंगायत समाजाचे वर्चस्व असल्याने देशमुख यांना याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पाटील यांनी शिवबंधन बांधले. यावेळी प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले की, भाजपात गेलो ती माझी वाट चुकली. सोलापूरचे दोन्ही आमदार काही कामाचे नाहीत. सोलापूरला भकास केले. दोन्ही देशमुखांच्या भांडणात सोलापूर भकास झाले. स्वतः च मंगल म्हणजे लोकमंगल, तंबाकू घ्यायचा आणि चुना लावायचा हेच काम या लोकांनी केले, अशी टीका पाटील यांनी केली.
दक्षिण सोलापुरात शिवसेनेचा आमदार करायला मी इथे आलो आहे. शिवसेनेचा आमदार झाला म्हणजे आमच्या कुटुंबातला आमदार झाला. फडणवीस यांनी मला पद देतो म्हणाले होते, मात्र त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आता बचेंगे तो और भी लडेंगे, एका समाजावर आमदार कोणी होत नाही, त्याला कष्ट करावे लागतात आणि घाम गाळावा लागतो, असे शिवशरण पाटील म्हणाले.