Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा, बैठका यांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आमचेच सरकार येणार असल्याचा दावा करताना पाहायला मिळत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. वेळ पडल्यास भाजपाला मतदान करू, पण तुतारीला मतदान करणार नाही, अशी भूमिका ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी घेतली आहे.
एका प्रचारसभेत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांचे आंदोलन मोठे केले. ओबीसी समाज महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. लोकसभेला झालेल्या पराभवाचा वचपा विधानसभेला घेतलेला दिसून येईल. या निवडणुकीत भलेभले तुतारीचे उमेदवार पाडल्याशिवाय ओबीसी राहणार नाहीत, असा एल्गार लक्ष्मण हाके यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांबद्दल काढले कौतुकोद्गार
देवेंद्र फडणवीस फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध का, देवेंद्र फडणवीस यांच्यातील क्षमता पाहा. त्यांनी मराठा समाजातील तरुणांना रोजगार दिले असतील तर त्यांनी मुख्यमंत्री व्हायला विरोध का? फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध का? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. तसेच जिथे वंचितचा उमेदवार नाही किंवा ओबीसी आरक्षणाच्या विचाराचा उमेदवार नाही, तिथे वंचितचा उमेदवार नसेल तिथे एक वेळेस भाजपाला मतदान करु. मात्र, शरद पवार गटाच्या तुतारीला मतदान नाही, असे लक्ष्मण हाके यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात ओबीसीचे २५ आमदार सत्तेत असतील, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला. होळकरांचे वंशज म्हणून कोणालाही पवार सध्या उभे करीत आहेत. होळकरांचे वंशज अमेरिकेपासून रॉयल फॅमिली आहे. ती असल्या राजकारणापासून लांब असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. तसेच रोहित पवार व प्रवीण गायकवाड यांच्या स्क्रिप्टवर चालणारा बाहुला आहे, अशी टीका हाके यांनी केला.