घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना

By दीपक भातुसे | Published: October 26, 2024 05:59 AM2024-10-26T05:59:48+5:302024-10-26T06:01:05+5:30

मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा फेटाळली

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Mahavikas Aghadi seat sharing Mess is unending new formula is 90 seats each with 18 seats to allied parties | घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना

घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/नवी दिल्ली: महाविकास आघाडीत सुरू असलेला वाद शुक्रवारीही शमला नाही. बुधवारी तीनही पक्षांना प्रत्येकी ८५ जागांच्या वाटपाची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी राहिलेल्या जागांचा वाद संपेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ६ जागांवरील तिढा कायम आहे. एकीकडे हा घोळ सुरू असताना तिकडे दिल्लीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी मविआतील ९०-९०-९० चा नव्या फॉर्म्युल्याची घोषणा केली. तीन पक्ष मिळून २७० जागा लढवणार असून उरलेल्या १८ जागा लहान मित्र पक्षांना देऊन त्यांचे समाधान केले जाईल, असे थोरात यांनी सांगितले.

काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार गट या पक्षातील मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत. अशातच उद्धव सेनेने परस्पर उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरेंना पत्र लिहून नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ज्या जागांवर मविआत वाद आहे तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार अशी चर्चा होती. मात्र काँग्रेस नेते पटोले आणि थोरात यांनी ही चर्चा फेटाळली. आम्ही आघाडी म्हणूनच लढणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

काही जागांची अदलाबदल होण्याचे संकेत

  • एकीकडे काँग्रेसचे नेते मातोश्रीवर जात असताना शुक्रवारी उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे शरद पवारांची भेट घेतली. 
  • या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उद्धव सेनेते जाहीर केलेल्या उमेदवार यादीत थोडा बदल होऊ शकतो, नावात किंवा जागेत बदल होऊ शकतो असे सांगत काँग्रेस -राष्ट्रवादी आणि आमच्यात एक-दोन जागांवर पुन्हा चर्चा होऊ शकतो, असे 
  • राऊत म्हणाले. 
  • काही जागांची अदलाबदल होईल, काँग्रेस १०० च्या वर जागा लढवेल, असे विजय वड्डेटीवार यांनी सांगितले.


कोणत्या जागांवर तिढा आणि कशासाठी?

  • वर्सोवा, भायखळा, रामटेक, परांडा, श्रीगोंदा, सांगोला या जागांवरून वाद आहे.
  • वर्सोवा व भायखळ्याची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.
  • रामटेकबाबत काँग्रेसचा आग्रह कायम आहे. उद्धवसेनेने तेथे विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. तेथे माजी मंत्री राजेंद्र मुळीक यांना निवडणूक लढवायची आहे.


नाना पटोलेंचे पत्र आणि ठाकरेंची नाराजी

  1. मविआत ज्या जागांवर तिढा कायम आहे अशा जागांवर उद्धव सेनेने परस्पर उमेदवार जाहीर करून एबी फॉर्मही दिल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. मात्र, पटोले यांच्या या पत्रामुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याचे समजते. 
  2. त्यामुळे वादाच्या जागांबाबत चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर येणाऱ्या काँग्रेस नेत्यांना उद्धव यांच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे समजते. उद्धव ठाकरे हे काही जागा सोडायला आधी तयार झालेही होते, मात्र पटोले यांच्या या पत्रानंतर ते आता जागा न सोडण्यावर ठाम असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Mahavikas Aghadi seat sharing Mess is unending new formula is 90 seats each with 18 seats to allied parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.