लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/नागपूर: महायुतीतील २८८ पैकी २७८ जागांबाबत एकमत झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दिल्लीत महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा केली. ज्या २३ जागांवर तिढा होता त्यापैकी १३ जागांवर निर्णय झाला. दहा जागांवरील तिढा कायम असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीहून नागपूरला परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
फडणवीस यांनी सांगितले की, भाजपची दुसरी यादी बहुदा शुक्रवारी घोषित केली जाईल. केवळ १० जागांवर तोडगा निघायचा आहे. त्या जागांबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल. महायुतीचा फॉर्म्युला त्यानंतरच घोषित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे जागावाटपाचे गणित ठरायचे आहे. ८५-८५-८५ मिळून २७० जागा कशा होतात हे समजण्याचा प्रयत्न सुपर कॉम्प्युटर व गणितज्ज्ञ करत आहेत, असा चिमटादेखील त्यांनी काढला.
दिल्लीतील बैठकीबाबत सूत्रांनी सांगितले की, दिल्लीतील बैठकीला अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते.
महायुतीचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध करावा
तिन्ही पक्षांनी संयुक्तपणे प्रचार करावा तसेच एकत्रित महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करावा, असा सल्ला शाह यांनी आजच्या बैठकीत दिला. महायुतीत एकमेकांचे उमेदवार पाडण्याची भूमिका कुठेही कोणीही घेतल्यास ते अजिबात खपवून घेऊ नका, असेही शाह यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.
फडणवीस-बावनकुळेंची गडकरींसोबत चर्चा
- नागपुरात दाखल झाल्यानंतर रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी रवाना झाले.- तीनही नेत्यांमध्ये दुसऱ्या यादीबाबत चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने मध्य नागपूर व पश्चिम नागपूरच्या उमेदवारीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाच दिवसांतील तिन्ही नेत्यांमधली ही दुसरी भेट आहे.