Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. ४ नोव्हेंबर ही अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे. ४ ताारखेपासून राज्यभरात प्रचारसभांना सुरुवात होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस लागली आहे. नुकत्याच झालेल्या सी-व्होटर सर्वेक्षणात राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीचा एक रंजक आराखडा मांडण्यात आला आहे. या अहवालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वैयक्तिक लोकप्रियता वाढली असली तरी सध्याच्या सरकारबाबत जनतेमध्ये काही प्रमाणात असंतोष असल्याचे दिसून येत आहे.
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले
मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकप्रियतेत उद्धव ठाकरे यांना मागे टाकल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मात्र, राज्यातील ५१ टक्के जनता शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज असून त्यांना सत्ताबदल हवा आहे, तर ४१ टक्के लोक सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचे मानत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘लाडकी बहीण योजना’चा लोकांमध्ये चांगलाच प्रभाव पडला आहे. ४५ टक्क्यांहून अधिक लोकांनी या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ही योजना निवडणुकीतील 'गेम चेंजर' मानली जात आहे. मात्र, सरकारची लोकप्रियता एवढी वाढली असली तरी सत्ताबदलाची मागणी कायम आहे.
मराठा आरक्षणाचा परिणाम होणार?
सी-व्होटरच्या सर्वेक्षणात मराठा आरक्षण हाही निवडणूक निकालांवर परिणाम करणारा मुद्दा असल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो, असे २३ टक्के लोकांचे मत आहे. याशिवाय बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई या मुद्द्यांमुळे सरकारविरोधात निदर्शने होत आहेत. ५२.२ टक्के लोकांनी शिंदे सरकारच्या विकासकामांचे कौतुक केले असले तरी बेरोजगारी आणि महागाईवर जनतेत तीव्र नाराजी असल्याचे दिसत आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीला भाजपला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. राष्ट्रवादीशिवाय भाजपची कामगिरी चांगली होऊ शकली असती, असे ४९ टक्के लोकांचे मत आहे, तर ३६ टक्के लोकांनी ही आघाडी फायदेशीर असल्याचे म्हटले आहे.