लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीला ज्या मुद्द्यांचा फटका बसला होता, त्यात जागावाटपाचा शेवटपर्यंत चाललेला घोळ हा महत्त्वाचा विषय होता. त्यापासून बोध घेत महायुतीने उमेदवार जाहीर करण्याबाबत महाविकास आघाडीपेक्षा सरशी साधली असल्याचे चित्र आहे.
आतापर्यंत भाजपने ९९, शिंदेसेनेने ४५ तर अजित पवार गटाने ३८ उमेदवार जाहीर केले आहेत. २८८ पैकी १८२ जागांवरील उमेदवार महायुतीने जाहीर केले आहेत. महायुतीने जाहीर केले आहेत. १०६ नावांची घोषणा बाकी आहे. महाविकास आघाडीत उद्धवसेनेने बुधवारी सायंकाळी ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी काँग्रेसने अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. शरद पवार गटाने एकेक करून एबी फॉर्म द्यायला सुरुवात केल्याची चर्चा होती, पण पक्षाने त्याबाबत अधिकृतपणे इन्कार केला आहे.
जागांचा फॉर्म्युला महायुती व मविआ या दोघांनीही जाहीर केलेला नाही, पण फॉर्म्युला अंतिम होत नाही म्हणून उमेदवार जाहीर करायचे नाहीत असे न करता ज्यावर तिन्ही पक्षांमध्ये सहमती आहे त्या जागा लवकर जाहीर करण्याचे महायुतीच्या नेत्यांनी निश्चित करत अंमलबजावणीही केली.
नाराजी टाळण्याची दक्षता
बंडावेळी साथ देणाऱ्या बहुतेक सर्व आमदारांना शिंदेसेनेची उमेदवारी मिळेल, फारतर दोनतीन अपवाद असतील असे मानले जाते. आपल्या जागांव्यतिरिक्तच्या जागांवर उमेदवार देताना कोणीही नाराज होणार नाही याची काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्तिशः घेतली.
प्रचाराला वेळ अन् नाराजांची मनधरणी
आधी उमेदवार जाहीर केल्याने प्रचाराला जास्त दिवस आम्हाला मिळतील व त्याचा अधिक फायदा होईल असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
भाजपने रविवारी जाहीर केलेले ९९ उमेदवार देताना यापैकी बंडखोरी, तीव्र नाराजी कुठेकुठे होऊ शकते याचा अंदाज आधीच घेतला आणि रा. स्व. संघ, भाजपचे स्थानिक पदाधिकारी, त्या विभागातील पक्षाचे मोठे नेते,राज्यस्तरीय नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 'मिशन समजूत' राबविण्याची जबाबदारी दिली.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या एकदोन दिवस आधी उमेदवार जाहीर केले तर बंडखोरी शमविण्याला वेळ मिळणार नाही, तेव्हा आठदहा दिवस आधी नावांची घोषणा केली तर नाराजांची मनधरणी करायला वेळ मिळेल, असा विचार करून निर्णय घेण्यात आला. त्यानुसार भाजप पाठोपाठ शिंदेसेना, अजित पवार गटानेही आपली यादी जाहीर केली.