Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मराठा समाजाने १०० टक्के मतदान करावे. कुणीही गैरहजर राहू नका. माझ्या निर्णयाची वाट पाहू नका. मराठा आरक्षणाला विरोध करणारे १०० टक्के पडले पाहिजेत. ते यायलाच नको. मराठ्यांची शक्ती जागोजागी दाखवा. जो कोणी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवेल, त्याला नक्की पाडा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालल्याचे अनेक ठिकाणी दिसले. आता विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर चालणार का, कुठे चालणार, किती प्रभाव असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. परंतु, ऐनवेळी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. परंतु, पाडापाडी होणार हे आवर्जून स्पष्ट केले. यानंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडण्याबाबत मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
..तर तो व्हिडीओ व्हायरल करु नका
मराठा समाज संभ्रमात असल्याचे पसरवले जात आहे. परंतु, मराठा समाज संभ्रमात नाही. ज्यांना स्वत:ला निवडून यायचे आहे, ते संभ्रम निर्माण करत आहेत. समाजाला सर्व माहिती आहे. ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा, मी स्पष्ट सांगितले आहे. ज्यांनी अन्याय केला, त्यांना सोडायचे नाही. आपल्या मागणीशी संबंधित असणाऱ्यांचे व्हिडिओ करून घ्या, जो आपल्या मागण्याशी सहमत राहील त्याला निवडून आणा. गाव, तालुका पातळीवर याबाब निर्णय घ्यावा, व्हिडिओ पण बनवा. लिहून पण घ्या. गावागावात व्हिडिओ बनवा, पण ते व्हायरल करू नका. कारण असे व्हिडिओ सगळ्या पक्षांपर्यंत, सर्व प्रकारच्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे पुन्हा संभ्रम निर्माण होऊ शकतो. संभ्रम निर्माण होणार असेल किंवा तो वाढणार असेल तर तो व्हिडिओ व्हायरल करू नका, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जर तुम्ही लिहून घेतले तरी आताच्या घडीला कोणीही लिहून देत आहे. मग तुम्हाला वाटेल की आपण कोणामागे उभे राहायचे. त्यामुळे लिहून घेऊ नका, काही करू नका. पण आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. नक्की पाडा. चूक करू नका. आपण राजकारण करायचे नाही. पण आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडायचे नाही. देवेंद्र फडणवीस आपले काही करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठ्यांच्या विषयी राग आणि द्वेष आहे. असला माणूस कुठेच जन्मू नये, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.