Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा, बैठका यांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आमचेच सरकार येणार असल्याचा दावा करताना पाहायला मिळत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा दिला. या दोन्हींवरून मनोज जरांगे पाटील यांनी भाजपावर टीका केली आहे. हिंदूंचे विभाजन कोण करणार आहे, अशी विचारणा करत, राज्यात मराठा ही हिंदूमधील सर्वांत मोठा समाज आहे. आम्ही आमच्यातील वाद सहज संपवू शकतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदुत्वाचे पालन करणारी लोक आहोत. आम्ही आमचे संरक्षण करू शकतो. तुम्ही तुमचे काम करा, या शब्दांत मनोज जरांगे यांनी निशाणा साधला.
हिंदू धोक्यात असेल तर या लोकांनी मराठ्यांची स्थिती ठीक करणे गरजेचे
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जे हिंदू एकतेच्या बाता मारतात, याच लोकांनी अल्पसंख्यांकांना निशाणा करण्यासाठी मराठ्यांचा वापर केला. मराठा समाजाने त्यांच्या हक्काची, अधिकाराची मागणी केली, तेव्हा त्यांनी झिडकारले. हिंदू धोक्यात असेल तर या लोकांनी मराठ्यांची स्थिती ठीक करणे गरजेचे आहे. आम्ही आरक्षणाची मागणी करतो, तेव्हा मराठ्यांना हिंदूविरोधी असल्याचे ठरवता तर मुस्लिमांवर निशाणा साधतात, तेव्हा आमची गरज पडते, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जे लोक हिंदू खरते में है, असा नारा देत आहेत. तेच लोक महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. भाजपा आणि महायुतीचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार तयार आहेत. यांच्यामुळे प्रत्येक वर्गाला त्रास झाला. मराठ्यांना कुणाला पाडायचे आणि कुणाला निवडायचे हे चांगले माहिती आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते एका मुलाखतीत बोलत होते.