Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. कोणत्या जागेवरील उमेदवार पाडण्याचे याबाबतही सांगितले होते. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. यावर मनसे नेत्यांनी प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी का माघार घेतली हे तेच स्पष्ट सांगू शकतात. मनोज जरांगे साधा, सरळ, भोळा माणूस आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुस्लीम धर्मगुरुंनी धोका दिला म्हणून त्यांनी निवडणूक उमेदवार न देण्याचा असा निर्णय घेतला असावा, असे वाटते. मुस्लिमांचे ठरलेले आहे की, कोणाच्या बाजूने मतदान करायचे आणि कोणाच्या विरोधात करायचा आहे. मौलाना नोमानी यांचे जे वक्तव्य आहे, त्यातून हिंदूधर्म मानणाऱ्या पक्षाच्या विरोधात मुस्लिमांना मतदान करायचा आहे. जे हिंदूंना आपले मानतात त्यांच्या विरोधात मुस्लिम मतदान करणार हे निश्चित आहे. त्यामुळे हिंदूंनी सुद्धा याचा विचार करावा, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील समाजासाठी काम करत आहेत
मनोज जरांगे पाटील समाजासाठी काम करत आहेत . पुढेही ते समाजासाठी काम करत राहतील. त्यामुळे समाजाचा विचार करून त्यांनी भूमिका घेतली असेल. लोकसभेसारखी परिस्थिती आता नाही. त्यामुळे या भूमिकेचा फायदा तोटा कोणाला होईल हे सांगता येणार नाही. मुस्लीम धर्मगुरूंनी फारशी रुची जरांगे पाटील यांच्यासोबत जाण्याची दाखवली नाही. मुस्लिम धर्मगुरुंनी जरांगे पाटील यांना फसवले, असे माझे मत आहे, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उमेदवारी मागे घेण्याबाबत आम्ही कधीही सदा सरवणकर यांना म्हणालो नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनौपचारिक विनंतीही कधी केली नाही. सदा सरवणकर यांच्यावर कुणी दबाव टाकलाय, स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी सदा सरवणकर हे सर्व वक्तव्य करत आहेत. तुम्ही लढू नका, असे आम्ही त्यांना कधीही सांगितले नाही. आम्ही लढणार हे निश्चित आहे. सदा सरवणकर यांचे दोन्ही पाय केळ्याच्या सालीवर आहेत. १५ वर्ष ते नगरसेवक होते, १५ वर्ष आमदार होते. आता सिद्धिविनायकाचे अध्यक्षपद दिले आहे. गजाननाची सेवा करावी आणि तरुण पिढीला वाव द्यावा. अमित ठाकरे हे बाकी सगळ्यांप्रमाणे एक मनसैनिक आहेत. त्यांना इतरांप्रमाणे समान वागणूक दिली जाते, असे प्रकाश महाजन यांनी सांगितले.