मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनपेक्षितपणे नाशिकमध्ये भाजपाला धक्का देण्यात आला आहे. १३ जणांच्या या यादीत ठाणे, पालघर, नाशिकमधील काही जागांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी मनसेनं ७ उमेदवारांची घोषणा केली त्यानंतर मंगळवारी ४५ जणांची दुसरी उमेदवार यादी घोषित करण्यात आली.
मनसेच्या तिसऱ्या यादीत कुणाला स्थान?
अमरावती - मंगेश पाटीलनाशिक पश्चिम - दिनकर धर्माजी पाटीलअहमदपूर चाकूर - नरसिंग भिकाणेपरळी - अभिजीत देशमुखविक्रमगड - सचिन शिंगडाभिवंडी ग्रामीण - वनिता शशिकांत कथुरेपालघर - नरेश कोरडाशहादा - आत्माराम प्रधानवडाळा - स्नेहल सुधीर जाधवकुर्ला - प्रदीप वाघमारेओवळा माजिवडा - संदीप पाचंगेगोंदिया - सुरेश चौधरीपुसद - अश्विन जयस्वाल
मनसेच्या तिसऱ्या यादीत भाजपाचे नाशिकमधील नाराज ज्येष्ठ नेते दिनकर पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातून मनसेने त्यांना उमेदवारी दिली आहे. नाशिक पश्चिममधून महायुतीकडून पुन्हा एकदा सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या दिनकर पाटील यांनी मनसेच्या तिकिटावर लढण्याचं ठरवलं आहे. भाजपाकडून इच्छुक असलेले दिनकर पाटील यांनी मंगळवारी समर्थकांचा मेळावा घेतला होता.
विक्रमगड मतदारसंघात सचिन शिंगडा यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. सचिन शिंगडा हे पालघरचे माजी खासदार दामू शिंगडा यांचे चिरंजीव आहेत. दामू शिंगडा हे ५ टर्म काँग्रेसचे खासदार राहिले होते. सचिन शिंगडा हे विक्रमगड परिसरात सक्रीय असतात. पालघर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदाची त्यांच्यावर जबाबदारी होती. परंतु मनसेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत सचिन शिंगडा यांनी मनसेत प्रवेश केला होता. मनसेने यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यात महायुती आणि मविआ यांच्यात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार असून सर्वात जास्त जागा मनसे लढेल असं राज ठाकरेंनी म्हटलं होते. मनसेच्या प्रमुख नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानंतर आता मनसेने महायुती, मविआच्या नाराजांवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येते.