राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती, मविआ, महाशक्तीसोबतच मनसेदेखील बऱ्याच मतदारसंघांत उभी ठाकली आहे. यामुळे यंदाची लढत ही बहुरंगी ठरणार आहे. निकालानंतर सत्तास्थापनेचे गणित जुळविताना पक्षांना घाम फुटणार आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. अशातच मनसेच्याअकोला पश्चिमच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने खळबळ उडाली आहे. मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्याच उमेदवाराच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे.
अकोला जिल्ह्याच्या राजकारणात उमेदवाराने आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप केला जात आहे. यातूनच मनसे कार्यालयाची तोडफोड करण्याची वेळ मनसेच्याच नेत्यांवर आल्याचे बोलले जात आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या उमेदावर प्रशंसा मनोज अंबेरे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. अंबेरे या अकोल्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने 138 उमेदवार जाहीर केले होते, मात्र आता एक अर्ज बाद झाल्यामुळे मनसेचे 137 अधिकृत उमेदवार असणार आहेत.
विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वयाची किमान 25 वर्षे पूर्ण असावी लागतात. मात्र प्रशंसा अंबेरे यांचे वय 24 वर्षे असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातही वयाचा उल्लेख आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांनी त्यांची संधी हुकली आहे. अवघ्या 25 दिवसांनी उमेदवारी रद्द झाल्याने मनसेचे नेते, कार्यकर्ते संतापले आहेत. कमी वय मुद्दाम आपल्यापासून लपवून ठेवल्याचा आरोप करत उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचे कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
अंबेरे यांनी विरोधी उमेदवारांशी हातमिळवणी करून जाणीवपूर्वक आपलं वय कमी असल्याची बाब लपवल्याचा आरोप आता मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष अविनाश मुरेकर आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून ही तो़डफोड केली आहे.
अकोल्यात काय चित्र?अकोला पश्चिम मतदारसंघातून महायुतीतून भाजपचे विजय अगरवाल निवडणूक लढवत आहेत. तर, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून साजिद खान आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून राजेश मिश्रा अशा दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.