“मविआची सत्ता आल्यावर कर्जमाफीसह शेतकरी हिताचे निर्णय घेऊ”; नाना पटोलेंनी दिला शब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 05:30 PM2024-11-12T17:30:48+5:302024-11-12T17:31:03+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: गेल्या १० वर्षात नरेंद्र मोदी देशाला सेफ करू शकले नाहीत आणि ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देत मते मागत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सत्तेत येताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही. शेतमालाला भाव नाही. उलट मोदींनी शेती साहित्याचा खर्च वाढवला. बी बियाणे, डिझेल महाग केले. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, कापसाला भाव दिला जात नाही. हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भाजपा हा शेतकरीविरोधी पक्ष असून शेतकऱ्यांना मते मागण्याचा भाजपाला काही एक अधिकार नाही. काँग्रेस मविआची सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतकरीहिताचे निर्णय घेऊ, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोट विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस व मविआचे उमेदवार महेश सुधाकरराव गणगणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित केले. भाजपाचे सरकार आले तर नदीजोड प्रकल्प करण्याची देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती पण २०१४ ते १९ भाजपाचे सरकार होते त्यानंतर अडीच वर्षांचे सरकार होते पण फडणविसांनी ते काम केले नाही. काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांची ही संकल्पना असून मविआची सत्ता आल्यानंतर हा नदीजोड प्रकल्प पूर्ण करु. २०१९ मध्ये काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळून मविआची सत्ता स्थापन केली आणि पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली. आता काँग्रेस मविआचे सरकार आले की जुनी पेन्शन लागू करू, २५ लाखांचा आरोग्य विमा, महिलांना ३ हजार रुपये, शेतकऱ्यांना ३ लाखांची कर्जमाफी व शेतमालाला भाव देऊ, असा शब्द नाना पटोले यांनी यावेळी बोलताना दिला.
जातीधर्मात फूट पाडून सत्ता मिळवण्याचा भाजपाचा हा डाव
निवडणुका आल्या की, भाजपा हिंदू-मुस्लीम करून मते मागतो. जातीधर्मात फूट पाडून सत्ता मिळवण्याचा भाजपाचा हा डाव आहे परंतु देशाच्या एकात्मतेसाठी काँग्रेसच्या इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी बलिदान दिले आणि आजचे पंतप्रधान एक हैं तो सेफ हैं, म्हणत मते मागत आहेत. १० वर्षात नरेंद्र मोदी देशाला सेफ करू शकले नाहीत. मोदी हे देशातील आजपर्यंतचे सर्वात कमजोर पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रातील ६७ हजार महिला बेपत्ता आहेत, बदलापुरच्या शाळेत लहान मुलींवर अत्याचार केले, महिला मुली सुरक्षित नाहीत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.