निकालानंतर अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे सांगणे कठीण; नवाब मलिक यांच्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 12:55 PM2024-11-04T12:55:26+5:302024-11-04T12:56:25+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नाही आणि कुणीही कायमचा मित्र नाही. परिस्थिती बदलत राहते. शत्रू मित्र होतात, मित्र शत्रू होतात, असे सूचक विधान करण्यात आले.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीमध्ये असतो तर अणुशक्ती नगरमधून तिकीट मिळाले नसते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले ही चुकीची बाब आहे. यावर आता काही बोलायचे नाही. अजित पवार यांनी वैयक्तिकरित्या मदत केली, त्यामुळे आपण त्यांच्याबरोबर आलो, एवढेच एक कारण आहे. अजित पवार आज भाजपाबरोबर असले तरी त्यांनी त्यांची विचारधारा सोडलेली नाही. तसेच मीदेखील माझी समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी विचारधारा सोडलेली नाही, असे अजित पवार गटाचे नेते आणि उमेदवार नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
राजकारणात नवखा नाही, त्यामुळे काय होऊ शकते, याची कल्पना आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर टीका होईल, याची कल्पना होती, तरीही त्यांनी उमेदवारी दिली. हे फक्त अजित पवारच करू शकतात. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे कसे पकडून आणले? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे, असे सांगत नवाब मलिक यांनी काही मोठे दावे केले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचेच सरकार येईल, हे सांगणे कठीण
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे आताच सांगणे कठीण आहे. या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही. आता काही लोक सांगत आहेत की, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे काही तरी चालले आहे. अशी वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे, असा मोठा दावा नवाब मलिकांनी केला. ते एका मुलाखतीत बोलत होते.
दरम्यान, राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नाही आणि कुणीही कायमचा मित्र नाही. परिस्थिती बदलत राहते. शत्रू मित्र होतात, मित्र शत्रू होतात. २०१९ च्या विधानसभा निकालानंतर काय घडणार याचा अंदाज कुणी बांधला होता का, तसेच २०२४ च्या निकालानंतरची परिस्थिती काय असेल सांगता येत नाही. परिस्थितीनुसार काहीही घडू शकते त्यात अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत असतील, अशी खात्री आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील, असा दावाही मलिकांनी केला.