कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 02:44 PM2024-10-26T14:44:20+5:302024-10-26T14:45:44+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभेप्रमाणे शरद पवार पुन्हा एकदा अजित पवारांना कात्रजचा घाट दाखवतात की, अजित पवार करेक्ट कार्यक्रम करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp ajit pawar group vs sharad pawar direct fight in 15 constituencies | कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने

कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: राज्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच राजकारणातील घडामोडींनाही वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीने आता तीनही पक्षांना ९० जागांचा नवा फॉर्म्युला जाहीर केला असून, महायुतीत १० जागांवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटातील धुसपूस सातत्याने समोर येत असल्याचे दिसत आहे. यातच ठाकरे गटाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसनेही एकमेकांसमोर उमेदवार दिले आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारी यादींनुसार १५ मतदारसंघात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा सामना पाहायला मिळणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला ऐतिहासिक खिंडार पाडले आणि आमदार, खासदारांसह वेगळी चूल मांडली. भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे सरकार स्थापन केले. या घटनेला वर्ष होत नाही, तोच अजित पवार यांनीही तसेच पाऊल उचलले आणि काही आमदार आणि खासदारांना सोबत घेतले आणि शरद पवारांपासून फारकत घेत राजकीय वर्तुळाला मोठा धक्का दिला. शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर अजित पवार यांनी महायुती सरकारला समर्थन दिले. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा करिष्मा फिका पडला आणि केवळ एक खासदार निवडून आला. उलट शरद पवारांनी पुन्हा एकदा इंगा दाखवत आणि आपले राजकीय वर्चस्व सिद्ध करत अनेक खासदार निवडून आणले. आता विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवार आणि अजित पवार आमनेसामने असणार आहेत. लोकसभेप्रमाणे शरद पवार पुन्हा एकदा अजित पवारांना कात्रजचा घाट दाखवतात की, अजित पवार करेक्ट कार्यक्रम करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

१५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने

सुरुवातीला बारामती मतदारसंघातून लढणार नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. परंतु, त्यानंतर उमेदवारी यादी जाहीर होताच बारामती मतदारसंघात अजित पवार यांनाच पक्षाने उमेदवारी दिल्याचे स्पष्ट झाले. लोकसभेपासून राजकारणात अधिक सक्रीय असलेले युगेंद्र पवार विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी येताच यावरही शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ४५ उमेदवारांची एक यादी जाहीर केली आहे. तर अजित पवार गटाने पहिल्या यादीत ३८ तर दुसऱ्या यादीद्वारे सात उमेदवार जाहीर केले. यातून पंधरा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट आमनेसामने आले असून, थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवारांनी अहेरी मतदारसंघातून धर्मराव अत्राम यांना उमेदवारी दिली आहे. तर, शरद पवारांनी याच मतदारसंघातून अत्राम यांची कन्या भाग्यश्री अत्राम यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे.

क्रमांकमतदारसंघांची नावे/ठिकाणराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटराष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
१.बारामतीयुगेंद्र पवारअजित पवार
२.इंदापूरहर्षवर्धन पाटीलदत्तात्रय भरणे
३.आंबेगावदेवदत्त निकमदिलीप वळसे पाटील
४.अहेरीभाग्यश्री अत्रामधर्मराव अत्राम
५.कागलसमरजीत घाटगेहसन मुश्रीफ
६.मुंब्रा-कळवाजितेंद्र आव्हाडनजीब मुल्ला
७.हडपसरप्रशांत जगतापचेतन तुपे
८.वसमतजयप्रकाश दांडेगावकरचंद्रकांत नवघरे
९.वडगाव-शेरीबापूसाहेब पठारेसुनील टिंगरे
१०.चिपळूणप्रशांत यादवशेखर निकम
११.शिरुरअशोक पवारज्ञानेश्वर कटके
१२.तासगाव–कवठे महांकाळरोहित पाटीलसंजयकाका पाटील
१३.इस्लामपूरजयंत पाटीलनिशिकांत पाटील
१४.उदगीरसुधाकर भालेरावसंजय बनसोडे
१६.कोपरगावसंदीप वर्पेआशुतोष काळे

 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp ajit pawar group vs sharad pawar direct fight in 15 constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.