“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 03:50 PM2024-11-06T15:50:51+5:302024-11-06T15:55:15+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. यावर मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी मीडियाशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, बारामतीचा मतदार माझा परिवार आहे. बारामतीच्या विकासात माझा खारीचा वाटा आहे. आमचा युतीचा जाहीरनामा येणार आहे. पण पक्षाचा जाहीरनामा येत आहे. ज्या भागात आमचे उमेदवार आहेत, तिथे वेगळे जाहीरनामे असतील. महाराष्ट्रमधील सगळ्यात जास्त निधी बारामतीत आणला. बारामतीला पहिले सौरऊर्जा शहर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच कॅन्सर हॉस्पिटलही उभारणार आहे, लॉजेस्टिक पार्क उभारणार आहे. शिक्षण, दर्जेदार रस्ता, शेतीच्या विकासाचा वादा, सामाजिक विकासाचा वादा पूर्ण करणार, असा शब्द अजित पवार यांनी दिला.
मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल
मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला सांगितले की, ते निवडणूक लढणार आहेत, पण आता त्यांनी तो निर्णय मागे घेतला आहे. मनोज जरांगे यांनी सांगत आहेत की, चांगल्या उमेदवाराला मत द्या. मग, आम्ही स्वत:ला चांगले समजतो, त्यामुळे मनोज जरांगे यांचा आम्हाला फायदा होईल, अशी मिश्कील टिपण्णी अजित पवार यांनी केली आहे. मला पक्षाने सांगितले इथे उभा राहा. माझ्यासमोर कोणीतरी उभे राहणार आहे. मी लढू शकत नाही का? जेव्हा निवडणुकीमध्ये उतरतो तेव्हा समोरचा उमेदवार स्ट्रॉंग आहे, असे म्हणूनच लढत असतो, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यामध्ये १० हमी देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यास लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० वरून २१०० रुपये देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यामध्ये करण्यात आले आहे.