Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून त्या त्या पक्षातील बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही मनधरणी यशस्वी होणार का, याचे उत्तर अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर मिळणार आहे. यातच आरक्षणाच्या मुद्द्याने राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळी अंतरवाली सराटीत गर्दी करताना दिसत आहेत.
भाजपामधून उमेदवारी मिळण्याची आशा धुसर असल्याने अन्य गटांमध्ये अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. त्यातील एक नाव म्हणजे समरजित घाटगे. कागल मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास समरजित घाटगे इच्छूक होते. परंतु, ही जागा अजित पवार गटाला सुटणार असल्याचे लक्षात येताच समरजित घाटगे यांनी लगेच शरद पवार गटात प्रवेश केला आणि उमेदवारी पक्की केली. अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात थेट लढत होणार आहे. यातच समरजित घाटगे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मनोज जरांगे पाटील आणि समरजीत घाटगे यांच्यात दोन तास चर्चा
कागल मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार समरजित घाटगे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. अंतरवाली सराटीमध्ये जाऊन समरजित घाटगे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. समरजित घाटगे कागल मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, सकाळी त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन मनोज जरांगे यांचा सत्कार केला. मनोज जरांगे आणि समरजित घाटगे या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, तत्पूर्वी मराठा, मुस्लीम, दलित (एमएमडी) मतांचे समीकरण जुळवण्यासाठी अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीत मराठा, मुस्लीम, दलित समीकरणावर एकमत झाले. मतदारसंघात इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. ३ नोव्हेंबरला कोणत्या जागी कोणता उमेदवार द्यायचे हे ठरवले जाईल. एक उमेदवार निवडला जाईल. इतरांनी अर्ज मागे घेत स्टार प्रचारक म्हणून काम करायचे, असा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला. मराठा समाजाला मी एकत्र केले आहे. आता मुस्लिम आणि दलित समाजदेखील सोबत आला आहे. यामुळे समीकरण जुळले आहे. आम्ही सोबत आल्याने बदल घडेल, असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.