“जगात असा पक्ष पाहिला नाही की...”; पक्षचिन्हावरुन जयंत पाटलांची अजितदादांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 02:42 PM2024-11-09T14:42:15+5:302024-11-09T14:44:07+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: ऑस्ट्रेलिया, चीन, अगदी पाकिस्तानमध्ये जा, पण अशी वेळ कोणत्याच पक्षावर आली नाही, असे सांगत जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर टीकास्त्र सोडले.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp group jayant patil criticized ajit pawar group over party symbol | “जगात असा पक्ष पाहिला नाही की...”; पक्षचिन्हावरुन जयंत पाटलांची अजितदादांवर टीका

“जगात असा पक्ष पाहिला नाही की...”; पक्षचिन्हावरुन जयंत पाटलांची अजितदादांवर टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीचे केंद्रातील आणि राज्यातील नेते राज्यभर प्रचारसभा घेत असून, महाविकास आघाडीचे केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व महाराष्ट्रभर सभा घेताना पाहायला मिळत आहे. भाजपा, काँग्रेससह अन्य अनेक पक्षांनी बंडखोरांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. 

भारतातील ८०० रेल्वे स्टेशनवर WiFi फ्री मिळावे यासाठी सरकारने गुगलसोबत साडेचार लाख कोटीचा करार केला. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ८६ हजार कोटी यांच्याकडे नाहीत. तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजे की WiFi? असा थेट सवाल जयंत पाटील यांनी केला. एका प्रचारसभेत ते बोलत होते. 

जगात असा पक्ष पाहिला नाही की...

आमचे घड्याळ चिन्ह चोरीला गेले आहे. पण, पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागते आहे की, आमचे चिन्ह 'न्याय प्रविष्ट' आहे. ऑस्ट्रेलियात, चीन, पाकिस्तानमध्ये जा, पण अशी वेळ कोणत्याच पक्षावर आली नाही. आमचे हे चिन्ह आहे, पण न्यायप्रविष्ट आहे हे सांगावे लागते आहे, आमचे घड्याळ चोरीला गेले आहे त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस आम्ही चिन्ह घेतले आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर केली.

दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात जाऊन १०० टक्के खात्री पटली आहे की, लोक महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. या भागाला स्मार्ट सिटी बनवणार होते. १० वर्षांत झाले का आपले शहर स्मार्ट? या शहरात बऱ्याच नव्या गोष्टी आपण आणू शकतो. महाविकास आघाडीला पूर्ण ताकदीने, भक्कमपणे साथ द्या, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp group jayant patil criticized ajit pawar group over party symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.