“बारामती फक्त शरद पवारांना कळते”; युगेंद्र पवारांच्या सभेत सुप्रिया सुळेंची अजितदादांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 02:15 PM2024-10-29T14:15:08+5:302024-10-29T14:17:28+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पक्ष आणि चिन्ह हिसकावण्याचे काम केले. निवडणूक आयोगात शरद पवार चार-चार तास बसायचे. काही बोलत नव्हते. शांत बसायचे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर टीका केली.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp group mp supriya sule slams ajit pawar in yugendra pawar rally | “बारामती फक्त शरद पवारांना कळते”; युगेंद्र पवारांच्या सभेत सुप्रिया सुळेंची अजितदादांवर टीका

“बारामती फक्त शरद पवारांना कळते”; युगेंद्र पवारांच्या सभेत सुप्रिया सुळेंची अजितदादांवर टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: कॉपी करून पास होण्यात काय मजा? अभ्यास करुन पास होऊन सर्टिफिकेट घेण्याचा आनंद वेगळा असतो. मला वाटायचे की सर्वजण गेले, आता आपले काय होणार? लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात दौरे करायचे. तेव्हा मला प्रश्न पडायचे की काय होणार? मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत समजले की, ताकद फक्त जनतेत असते आणि ते जनतेने लोकसभेला दाखवून दिले. कोणी काहीही म्हटले तरी बारामती मतदारसंघ ना मला कळतो, ना त्यांना कळतो. हा मतदारसंघ फक्त शरद पवारांना कळतो, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली.

बारामतीतून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर आता युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. कान्हेरी येथे झालेल्या प्रचारसभेत सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रात सध्या बरेच कार्यक्रम सुरु आहेत. अनेक ठिकाणी लागलेले बॅनर पाहते. त्या बॅनरवर लिहिले आहे की, चिन्ह तुमचे नाही. या चिन्हाची लढाई न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे ते विसरले असतील. मात्र, मी विसरलेले नाही. पक्ष आणि चिन्ह हिसकावण्याचे काम अदृष्य शक्तीने केले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

एका अदृष्य शक्तीने आपले घर फोडले

कोणत्याही एका व्यक्तीच्या विरोधात बोलत नाही. मी अदृष्य शक्तीबाबत बोलते. कारण एका अदृष्य शक्तीने आपले घर फोडले. पक्ष आणि चिन्ह हिसकावण्याचे काम केले. लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार हे माहिती नव्हते. निवडणूक आयोगात ज्यावेळी पक्षाच्या चिन्हाबाबत सुनावणी सुरु होती. तेव्हा निवडणूक आयोगात शरद पवार चार-चार तास बसायचे. काही बोलत नव्हते, पण शांत बसायचे. त्या ठिकाणी आम्ही असायचो. तेव्हा अनेकजण आमची मस्करी करायचे. म्हणायचे तुमचे चिन्ह आणि पक्ष जाणार आहे. मात्र, आम्ही काहीही बोलायचो नाही शांत बसायचो. पण आजही सांगते की, हा देश संविधानाने चालणार आहे. हा देश कोणत्याही अदृष्य शक्तीने चालणार नाही, यावर माझा विश्वास आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनीही प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, सुप्रिया सुळे यांनी मोठ्या फरकाने सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. आता विधानसभेत पुन्हा एकदा शरद पवारांची जादू चालणार की, अजित पवार लोकसभा पराभवाचा वचपा काढत बाजी मारणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp group mp supriya sule slams ajit pawar in yugendra pawar rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.