Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. आश्वासने, शब्द, गॅरंटी, वचने दिली जात आहे. महाराष्ट्रात आमचीच सत्ता येणार, असे दावे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केले जात आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर तसेच पंतप्रधान मोदी आणि भाजपा महायुतीवर टीका केली आहे.
त्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा दिला आहे. याला उत्तर म्हणून आता महाविकास आघाडीतील नेतेही विविध नारे देताना पाहायला मिळत आहेत. मीडियाशी बोलताना अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी एक प्रकारे कबुली दिली की, १० वर्ष सत्तेत असल्यानंतरही ते देशाला सुरक्षित ठेऊ शकले नाहीत. तसेच ‘बटेंगे तो कटेंगे’ असा प्रचार महायुतीला करावा लागत असेल तर मग या सरकारने काय विकास केला? असा थेट सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला.
पक्ष फोडणे-चिन्ह पळवण्याला राज्यात थारा नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार ३० ते ३५ वर्ष समाजकारण आणि राजकारणात आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात नेमकी काय हे त्यांना नक्कीच कळले असेल. त्यामुळे त्यांना भावनिक आवाहन करावे लागत असेल. याचाच दुसरा अर्थ असा होतो की, जनतेने ठरवले आहे की, महाविकास आघाडी सत्तेत आणायची, असा दावा अमोल कोल्हे यांनी केला.
दरम्यान, अशा प्रकारची परिस्थिती ओढावत असेल तर जे म्हणालो त्या पद्धतीने चुकीला माफी होते. पण गद्दारीला माफी होत नाही. एवढ्या मोठ्या दिग्गज नेत्याला जर गावोगावी फिरावे लागत असेल तर जनतेचा कौल काय? हे लक्षात घ्यायला हवे. पक्ष फोडणे आणि चिन्ह पळवणे याला महाराष्ट्रात थारा नाही, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली.