मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांनी कोणाला पाडायचे याची यादी जाहीर केली आहे. यामुळे राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागणार आहे. दुसरीकडे ओबीसी आंदोलक देखील १०० च्या वर उमेदवार जाहीर करणार आहेत. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी पूर्वीसारखी कोणाची मक्तेदारी राहिली नाही, अशा शब्दांत जरांगे यांच्यावर टोला लगावला आहे.
बंडखोरी हा निवडणुकीचा एक भाग आहे. जिल्हा परिषद, नगर पालिका यासह सर्वच निवडणुकीत देखील बंडखोरी होत असते. प्रत्येक मतदार संघात महायुती, महाविकास आघाडीत बंडखोरी आहे. सरासरी 30 उमेदवार प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आहेत. उद्या 4 वाजता खरे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात होईल, असे भुजबळ म्हणाले.
सर्वच समाजाचे उमेदवार माझ्या विरोधात रिंगणात उभे आहेत. त्यामुळे एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात काही अर्थ नाही. माझ्या सर्व विकासकामांमध्ये मराठा, दलित, आदिवासी, ओबीसी सर्व समाज सोबत आहेत. सर्वच जाती धर्माचे लोक मला मतदान करतील अशी केलेल्या विकास कामांमुळे मला खात्री आहे. त्यापुढे जावून सर्व पक्षाचे लोक देखील छगन भुजबळ म्हणून मला मतदान करतील असेही भुजबळ म्हणाले.
जरांगे-झिरवाळ भेटीवर बोलताना भुजबळ म्हणाले की, त्यांना वाटते भेटल्याने आपल्याला फायदा होईल पण आता पूर्वीसारखी कोणाची मक्तेदारी राहिली नाही. आता एका घरात चार वेगवेगळ्या विचाराचे, पक्षाचे लोक काम करत असतात. मतदार हे वैचारिक झाले आहेत. विचारधारा ही पक्षाच्या स्तरावर असते, तिथे सर्व गोष्टी तपासल्या जातात. याचा विचार करून लोक योग्य ठिकाणी मतदान करतात. त्यांना सर्व कळते मत कोणाला दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.