शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 10:03 AM2024-11-07T10:03:49+5:302024-11-07T10:04:23+5:30
सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त करत माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे.
Sadabhau Khot ( Marathi News ) : रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी जत येथील प्रचारसभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर करत टीका केली होती. सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतच वाद पेटला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत अशा प्रकारची भाषा खपवून घेतली जाणार नसल्याचं म्हटलं. तसंच अन्य नेत्यांकडूनही खोत यांच्यावर टीकेची झोड उठली. या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त करत माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे.
शरद पवारांवरील वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत सदाभाऊ खोत म्हणाले की, "कोणाच्या व्यंगत्वाकडे बघून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे, परंतु काही लोकांनी त्या शब्दाच्या अर्थाचा विपर्यास केला. यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो."
दरम्यान, "गावाकडे एखादा आभाळाकडे बघून बोलायला लागला तर आम्ही त्याला म्हणतो की, जा आरशात जाऊन बघ जरा. पण गावगाड्यातील भाषा समजून घेण्यासाठी मातीमध्ये रुजावं लागतं, झिजावं लागतं, राबावं लागतं. त्यावेळी गावाकडील आणि मातीची भाषा समजते," असा टोलाही यावेळी सदाभाऊ खोत यांनी लगावला होता.
निषेध व्यक्त करताना काय म्हणाले होते अजित पवार?
"ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्याविषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही," असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.