NCP Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "आर. आर. पाटील यांच्याबद्दल जे बोललं गेलं ते योग्य नाही. तसं घडलं नसतं चागलं झालं असतं," अशा शब्दांत शरद पवारांनीअजित पवार यांना फटकारलं आहे.
अजित पवारांच्या आरोपांविषयी बोलताना शरद पवार यांनी बारामतीतील पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, "सिंचन घोटाळ्याचा विषय आम्ही काढला नाही. आर. आर. पाटील यांची प्रतिमा चांगली होती. स्वच्छ होती. त्यांच्याबद्दल असं बोललं गेलं हे योग्य नाही." यावेळी पवार यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. "सिंचन घोटाळ्याची माहिती अजित पवार यांना फडणवीस यांनी दाखवली. त्यात काही चुकीचं नाही असं फडणवीस म्हणतात. पण त्यांनी घेतलेल्या गुप्ततेचा शपथेचा तो भंग आहे," असा हल्लाबोल पवार यांनी केला आहे.
अजित पवार नक्की काय म्हणाले होते?
"माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला. त्याच्या खुल्या चौकशीसाठीच्या फाईलवर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सही केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर ही फाईल मला दाखवली. आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापण्याचा प्रयत्न केला," असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील सभेतून केला होता.
दरम्यान, या आरोपावरून राज्यभर मोठा गदारोळ उडाल्यानंतर मात्र माझ्या दृष्टीने तो विषय संपल्याचं सांगत अजित पवारांनी वाद आणखी चिघळू न देण्याची भूमिका घेतली. अजित पवार यांनी नुकतंच म्हटलं की, "जे काही व्हायचं ते झालं आहे, मला ते आता परत उकरून काढायचं नाही. माझ्या सद्सद् विवेकबुद्धीला जे पटलं ते मी सांगितलं आहे. त्याचा आणि निवडणुकीचा अर्थाअर्थी संबंध नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने तो विषय संपला आहे," असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.