Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024:बाळासाहेब ठाकरे यांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अतुलनीय योगदान आहे. परंतु, काँग्रेस नेत्यांच्या तोंडून बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कौतुकाचा एकही शब्द बाहेर येत नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला. तसेच शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मान्य करण्याचे आव्हान केले. महाराष्ट्रातील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील असामान्य योगदानाबाबत अनेक गोष्टी नमूद केल्या.
महाविकास आघाडीतील काँग्रेस मित्रांना आव्हान देतो की, काँग्रेसच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक करावे आणि त्यांच्या विचारधारेला, विचारसरणीला मान्यता द्यावी. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांबाबत काँग्रेसचे नेते आजपर्यंत मौन बाळगून आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचे भान राखणारे विचार मांडले. जे काँग्रेसच्या विचारसरणीपासून बऱ्याच बाबतीत वेगळे आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा चर्चेत येऊ शकतात
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा चर्चेत येऊ शकतात. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला मविआतील सहकारी आणि घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांचे महत्त्व मान्य करण्यास सांगण्याचे दिलेल्या आव्हानाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
पंतप्रधान मोदींचे काँग्रेसला आव्हान आणि मविआमधील ऐक्य टिकवण्याची कसोटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले हे विधान, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षाच्या विचारांची विसंगती स्पष्टपणे मांडणारे असल्याचे म्हटले जात आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या या टिप्पणीने काँग्रेसने ठाकरे गटाच्या विचारांशी जुळवून घेतले तर, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मुद्द्यावरून काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसने भाजपा सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली असली तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला एकत्र ठेवण्याच्या दृष्टीने कसोटीचे ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे, या वक्तव्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नसली तरी काँग्रेसमधील अन्य काही नेत्यांनी ठाकरे गटासोबतच्या विचारसरणीतील फरक मान्य केल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाचे कौतुक न करण्याबाबत काँग्रेसच्या मौनावर पंतप्रधान मोदींनी बोट ठेवून महाराष्ट्राच्या मतदारांसमोर काँग्रेसची दुटप्पी प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, भाजपा व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या वारशाचा मुद्दा कायमच उचलून धरला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेससाठी एक आव्हान निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसची यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मान्यता देण्यास काँग्रेस तयार होते का आणि या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील ऐक्य टिकून राहते का, याकडे राज्याचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे.