Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला ठाकरे गटानेही प्रचारावर भर दिला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करत प्रचारसभा घेत आहेत. यातच वणी येथील हेलिपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
मी हेलिकॉप्टरने आलो तेव्हा आठ, दहा जण माझ्या स्वागतासाठी आले होते. म्हटले काय करायचे आहे. ते म्हणाले, बॅग तपासायची आहे, मी म्हणालो तपासा. त्यांचा व्हिडिओ काढला आहे. एक लक्षात घ्या की, तुम्हाला कुठेही चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवले तर त्यांचीही चौकशी करा. ते कुठे नोकरीला आहेत हे तपासा. जसे ते आपले खिसे तपासतात तसे त्यांचेही तुम्ही खिसे तपासा कारण हा आपला अधिकार आहे. माझ्या बॅगा तपासल्याबद्दल अधिकाऱ्यांवर रागावलो नाही. तुम्ही तुमचे काम करत आहात, मी माझे काम करत आहे. यानंतर मी त्याला म्हणालो की, मोदी आणि शाह यांची बॅग तपासली का? एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासायला हवी की नको? असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली.
बॅग तपासली म्हणून इश्यू करण्याची गरज नाही, पोलिसांचा तो अधिकार
सगळ्यांच्या बॅगा तपासल्या जातात. माझी बॅगही तपासली जाते. निवडणुकीच्या काळात बॅग तपासणे हा पोलिसांचा अधिकार आहे. त्यात इश्यू करण्याची काही गरज नाही. त्यात काही अर्थ नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. आतापर्यंत या पथकाने किती जणांच्या तपासण्या केल्या. मोदी आणि शाह इथे रोज फिरत आहेत, तपासणी केली का? मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या तपासण्या होत नाहीत. त्यांच्या हेलिकॉप्टर आणि वाहनातून पोलीस बंदोबस्तात पैशांचे वाटप सुरु आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या सामानाची वणी इथे तपासणी करण्यात आली. जे कायद्याला धरुन ते झालेच पाहिजे! पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून जो समानतेचा हक्क भारतीयांना दिला, तो सगळ्यांना लागू व्हायला हवा! कायदा सगळ्यांना समान हवा! महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्यांची तपासणी व्हायला हवी! होऊन जाऊ दे दूध का दूध और पानी का पानी!, अशी संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.