विदर्भात काँग्रेसची कोंडी? 'या' मतदारसंघांत नेत्यांची बंडखोरी; पवार, ठाकरे गटाविरोधात उभे ठाकले, मविआत नाराजीचे वारे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 09:47 PM2024-11-03T21:47:25+5:302024-11-03T21:47:54+5:30
बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरची मुदत आहे. ही मुदत उद्यावर येऊन ठेपली तरी बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांना यश आलेले नाहीय.
नागपूर : मविआला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. विदर्भात आपल्यालाच सर्व जागा सुटाव्यात म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जागावाटपात वाद घालणाऱ्या काँग्रेसला त्यांच्या पक्षाचे उमेदवार देऊनही बंडखोरांचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी मित्रपक्षांना जागा सुटल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी केलेली आहे. याचा फटका काँग्रेसला व मविआला विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरची मुदत आहे. ही मुदत उद्यावर येऊन ठेपली तरी बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांना यश आलेले नाहीय. काँग्रेसला जागा न मिळाल्याने पदाधिकारी नाराज झाले असून त्यांनी पक्षविरोधी काम करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. या बंडखोरांमुळे मविआचे उबाठा आणि शरद पवार गटामध्येही नाराजी व्यक्त केली जात असून काँग्रेसचे उमेदवार असलेल्या इतर जागांवर याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसच्या बंडखोरीमुळे आघाडीत संताप
मविआच्या नेत्यांनी आपापल्या पक्षांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. जागावाटपासाठी चाचपणी करण्याचा हा मुळ उद्देश होता. परंतू, झाले असे की मुलाखत दिलेल्या सर्वांच्याच मनात तिकीट मिळण्याची आशा निर्माण झाली आणि ते निवडणुकीच्या तयारीला लागले. आता तिकीट न मिळाल्याने माघार कशी घ्यायची, पैसा, ताकद तर खर्ची पडली यामुळे हे इच्छुक आता माघार नाही या आवेशानेच निवडणुकीत उतरले आहेत.
माजी मंत्री सुनील केदार यांचे समर्थक असलेले जि.प.चे समाज कल्याण सभापती मिलींद सुटे यांनी उमरेड मतदरसंघात तर जि.प. सदस्य उज्वला बोढारे व वृंदा नागपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असलेल्या हिंगणा मतदारसंघात बंडखोरी केली आहे. शिवसेनेकडे असलेल्या रामटेकमध्ये अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडे असलेल्या काटोल मतदारसंघात युवक काँग्रेसचे याज्ञवल्क्य जिचकार यांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत संताप व्यक्त केला जात आहे.
विदर्भातील या मतदारसंघात काँग्रेसकडून बंडखोरी
नागपूर पूर्व - पुरुषोत्तम हजारे, सावनेर- अमोल देशमुख, काटोल- राजश्री जिचकार, उमरेड- मिलींद सुटे, रामटेक- राजेंद्र मुळक, बल्लारपूर- डॉ. अभिलाषा गावतुरे, भंडारा- प्रेमसागर गणवीर, मनोज बागडे, तुमसर- अनिल बावनकर, साकोली- मनोज बागडे, अर्जुनी मोरगाव- अजय लांजेवार, आमगाव- अनिल कुमरे, गडचिरोली- डॉ. सोनल कोवे, विश्वजीत कोवासे, आरमोरी- शिलू चिमूरकर, अहेरी- हनुमंत मडावी, दर्यापूर- गुणवंत देवपारे, रामेश्वर अभ्यंकर, उमरखेड- संजय खाडे, वर्धा- डॉ. सचिन पावडे, सुधीर पांगुळ, अकोला पश्चिम- मदन भरगड, अकोला पूर्व- डॉ. सुभाष कोपरे, मेहकर- लक्ष्मण घुमरे, मलकापूर - हरिष रावळ, कारंजा- ज्योती गणेशपुरे असे बंडखोर आहेत.