प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 02:52 PM2024-11-28T14:52:13+5:302024-11-28T14:54:26+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या २० उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, असा दावा केला जात आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटून गेले असले तरी अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्याने आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, भाजपाकडून अद्याप याबाबत कोणत्याही निर्णय झालेला नाही. भाजपा धक्कातंत्राचा वापर करणार की, देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. परंतु, यातच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला निवडणुकीत यश मिळाले नसले तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगलाच फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. यातही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. वंचित बहुजन आघाडीने विधानसभेच्या २०० जागा लढवल्या होत्या. १९४ मतदारसंघांत उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाली. एका मतदारसंघात दुसऱ्या तर ५८ मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिले. विधानसभा निवडणुकीत ‘लाडक्या बहिणी’ योजनेचा मोठा प्रभाव दिसला असला तरी लोकसभेला मिळालेला मतांचा वाटा राखण्यात वंचित बहुजन आघाडीला यश मिळाल्याचे सांगितले जात आहे.
प्रकाश आंबेडकरांचे ‘बौद्ध, मुस्लीम-ओबीसी’ समीकरण
प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी जागावाटपात आणि निवडणूक प्रचारात ‘बौद्ध, मुस्लीम-ओबीसी’ समीकरण केले होते. राज्यात ‘अनुसूचित जाती’ची ११ टक्के लोकसंख्या असून या विधानसभेला सहा आघाड्यांमधील १४ आंबेडकरी पक्षांनी ६७४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यामध्ये एकमेव वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर दखलपात्र कामगिरी केली. वंचित बहुजन आघाडीला एकूण १४ लाख २२ हजार म्हणजेच ३.१ टक्के मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला १५ लाख ८२ हजार म्हणजेच ३.६ टक्के मते मिळाली होती.
प्रकाश आंबेडकरांनी दाखवला इंगा, महाविकास आघाडीला महागात पडला पंगा
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या २० उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, असा दावा केला जात आहे. यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ८, काँग्रेसला ६, ठाकरे गटाला ६, एमआयएमच्या दोन उमेदवारांना चांगलाच फटका बसून नुकसान झाल्याचे समजते.