Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. लोकसभेला ज्याप्रमाणे स्थिती होती, त्यावरून महाविकास आघाडीला चांगला जनाधार मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राजकारण चांगलेच तापले होते. परंतु, सगळ्या शक्यतांना छेद देत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला न भूतो, न भविष्यती, असे यश दिले. महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला. अविश्वसनीय, अनाकलनीय आणि अस्वीकार्ह निकाल असल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून देण्यात आली. महाविकास आघाडीला आता विरोधी पक्षनेता बसवणेही शक्य होणार नाही, असेच चित्र आहे. यातच पिपाणी आणि तुतारी चिन्हाच्या घोळामुळे शरद पवार गटाला मोठा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.
या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ १० जागांवर विजय मिळवता आला. बड्या पक्षांच्या यादीतील शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांत तळात गेली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे पिपाणी चिन्हाचा फटका विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाला बसल्याचे समोर येत आहे. पिपाणी चिन्हाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून अनेक अपक्ष उमेदवारांनी पिपाणी चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. चिन्हाच्या घोळाचा या निवडणुकीतही शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार नऊ ठिकाणी पडल्याचे दिसून आले आहे.
पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
पिपाणी आणि तुतारी या चिन्हांमध्ये मतदारांचा घोळ झाला. त्यामुळे जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव पारनेर, केज, परांडा या नऊ मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार पराभूत झाले. या उमेदवारांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला, त्यापेक्षा जास्त मते पिपाणीला मिळाली आहेत. यावरून मतदारांनी पिपाणीलाच तुतारी समजून मतदान केल्याची चर्चा रंगू लागली आहे.
- शहापूर मतदारसंघात शरद पवार गटाकडून पांडुरंग बरोरा निवडणूक रिंगणात होते. बरोरा यांचा १६७२ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला ३८९२ मते मिळाली. परिणामी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.
- बेलापूर मतदारसंघात अटीतटीची लढत झाली. शरद पवार गटाचे संदीप नाईक यांचा अवघ्या ३७७ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला २८६० मते पडली. या ठिकाणी भाजपाच्या मंदा म्हात्रे या विजयी झाल्या.
- अणुशक्ती नगर मतदारसंघात शरद पवार गटाकडून फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा ३३७८ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला ४०७५ मते मिळाली. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक विजयी झाल्या.
- जिंतूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे विजय भांबळे उभे होते. त्यांचा ४ हजार ५१६ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणीला ७ हजार ४३० मते मिळाली. त्यामुळे भाजपाच्या मेघना बोर्डिकर या विजयी झाल्या.
- घनसावंगी मतदारसंघात शरद पवार गटाचे राजेश टोपे निवडणूक रिंगणात होते. राजेश टोपे यांचा २३०९ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला ४८३० मते मिळाली. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले.
- आंबेगाव मतदारसंघात शरद पवार गटाच्या देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्यात आली होती. देवदत्त निकम यांचा १५२३ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला २९६५ मते मिळाली. या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील विजयी झाले.
- परांडा मतदारसंघात शरद पवार गटाचे राहुल मोटे उमेदवार होते. त्यांचा १५०९ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला ४४४६ मते मिळाली. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत विजयी झाले.
- पारनेर मतदारसंघात शरद पवार गटाकडून राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली होती. राणी लंके यांचा १५२६ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला ३५८२ मते मिळाली. या मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काशिनाथ दाते विजयी झाले.
- केज मतदारसंघात शरद पवार गटाकडून पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देण्यात आली होती. साठे यांचा २६८७ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणी चिन्हाला ३५५९ मते मिळाली. भाजपाच्या नमिता मुंदडा विजयी झाल्या.