“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 05:58 PM2024-12-02T17:58:00+5:302024-12-02T18:07:23+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: लोकसभेला भाजपाबाबत तीव्र नाराजी जनतेच्या मनात होती. अचानक एवढा बदल होऊन भाजप महायुतीबद्दल इतका विश्वास संपादन करणे, अशक्य आणि अविश्वसनीय आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा झाला तरीही महायुतीकडून मुख्यमंत्री कोण होणार, सत्ता कधी स्थापन करणार, याबाबत स्पष्टता दिसत नाही. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीच्या नेत्यांवर टीका केली जात आहे. तसेच ईव्हीएमविरोधातील लढाई तीव्र केली आहे. यातच आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाला स्वायत्तता आहे. मुक्त वातावरणात पारदर्शकपणे निवडणुका घेतल्या आहेत, असा निर्वाळा दिला जात असला, तरी जनतेच्या मनात मतदान यंत्रांबाबत शंका आहे. मग, सर्व मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या मोजणीला किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याला सरकार का घाबरते, असा सवाल करत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठराविक मतदान यंत्रांतील मतचिठ्ठ्यांची तपासणी झाली, तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण, ठराविक मतदान यंत्रांमधील डेटा नष्ट केला जाऊ शकतो, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवर टीकास्त्र सोडले.
उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले
यंदाची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. त्यामुळे त्यांना फसवले जाणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे फसवले गेले असल्याचे दिसून येत आहे. राज्यात २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना उद्धव ठाकरे यांना फसवले, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांना फसविले आहे, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. निवडणुकीत पैशाचा वापर, सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाही नष्ट केली आहे. सत्तेचा गैरवापर करून पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटण्यात आले. निवडणूक आयोग याबाबत शांत राहिला, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
दरम्यान, कोणत्याही निवडणुकीत जनतेचा विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, मतदान यंत्राबाबत जनतेचा विश्वास राहिलेला नाही. पुन्हा मतपत्रिकेवर (बॅलेट पेपर) निवडणुकांकडे जाण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने केंद्रातील भाजपा सरकारबद्दल तीव्र नाराजी दाखवून दिली. मात्र, पुढील चार महिन्यांच्या कालावधीत अचानक मतदारांच्या मनात एवढा बदल होऊन भाजप महायुती सरकारबद्दल इतका विश्वास संपादन करणे, अशक्य आणि अविश्वसनीय आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.