Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या कलांनुसार, महायुतीने २२० जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार ५८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर अपक्ष १० जागांवर आघाडीवर आहेत. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आणि लाडक्या बहिणींचे मनापासून आभार मानले आहेत.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. "मुख्यमंत्रिपदाबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ, ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही. सर्व आकडे येऊदे. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. जसं आम्ही एकजूट होऊन निवडणूक लढलो. तसेच आम्ही त्यावरही एकत्र, एकजुटीने निर्णय घेऊ" असं शिंदेंनी म्हटलं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Results 2024
"महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो. समाजातील प्रत्येक घटकाने महायुतीला भरभरून मतदान केलं आहे. गेले दोन-अडीच वर्षे जे महायुतीने काम केलं, त्या कामाची पोचपावती या निवडणुकीत जनतेने दिली. म्हणून महाराष्ट्रातील जनतेचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. पूर्णपणे आम्ही जे काम केलं त्याची पोचपावती जनतेने दिली" असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
महायुतीने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र असून, महाविकास आघाडी चितपट झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाने १२७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे ५७ उमेदवार आघाडीवर आहेत. तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ३८ जागांवर आघाडीवर आहेत. सुरुवातीचे कल पाहिल्यास महाविकास आघाडीला विधानसभेत विरोधी पक्षनेता बसवणेही कठीण झाल्याचे चित्र आहे.
विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडायचा असेल, तर कोणत्याही एका पक्षाला २९ जागा निवडून येणे आवश्यक असते. महाविकास आघाडीची १२ वाजेपर्यंतची स्थिती अशी आहे की, काँग्रेस केवळ १८ जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना ठाकरे गट १७ जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १९ जागांवर आघाडीवर आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता विरोधी पक्षनेता करण्याएवढी मते तरी महाविकास आघाडीतील कोणत्या घटक पक्षाला मिळतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.