Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. लोकसभेला ज्याप्रमाणे स्थिती होती, त्यावरून महाविकास आघाडीला चांगला जनाधार मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. शिवाय मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राजकारण चांगलेच तापले होते. परंतु, सगळ्या शक्यतांना छेद देत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला न भूतो, न भविष्यती, असे यश दिले. महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला. अविश्वसनीय, अनाकलनीय आणि अस्वीकार्ह निकाल असल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून देण्यात आली. महायुतीच्या त्सुनामीत महाविकास आघाडीचा मोठा धुव्वा उडाला. महाविकास आघाडीला आता विरोधी पक्षनेता बसवणेही शक्य होणार नाही, असेच चित्र आहे.
या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तब्बल १३२ जागा जिंकल्या. तर शिवसेना शिंदे गटाने ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळवता आला. यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर, देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असा कयास बांधला जात आहे. याबाबत महायुतीचे बैठकांचे सत्र सुरू आहे. लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत, असे वाटते?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत, असे वाटते, असा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, आमच्यासाठी कोण समाधानकारक आहे? आमच्या वाट्याला नेहमी संकटच आले आहेत. ७०-७५ वर्षांत आमच्या वाट्याला संघर्ष आला आहे, कोणीही आला काय त्याचे आम्हाला सुख किंवा दुःख असण्याचे काही कारण नाही. आमच्या जीवनात संघर्ष आहे आणि तो आम्हाला करावाच लागणार आहे. आमची जात आणि आमचे लेकरे मोठे करण्यासाठी आम्हाला लढावे लागणार आहे. कोण आल्याने आमच्या समाजाचे भले होईल, असे आम्ही कधीही अपेक्षित धरले नाही. त्यामुळेच आम्ही उठाव आणि चळवळीवर विश्वास ठेवला आहे, त्यामुळे कोणी आले काय आणि कोणी मुख्यमंत्री झाले काय आम्हाला लढावे लागणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पहिल्यांदा तेच होते आणि आताही तेच आहे. आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. आम्हाला लढावेच लागणार, हे पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे. आम्हाला काही वाटत नाही. कोणीही मुख्यमंत्री झाले काय? नाही झाले काय? त्याचे आम्हाला कुठलेही सोयर सुतक नाही. आम्ही आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा करणार आहोत. देशात कधी झाले नसेल असे मोठे सामूहिक आमरण उपोषण करणार आहोत. मराठे पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत. आता राजकारणाचा विषय संपला आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.