Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी अतिशय धक्कादायक होते. स्वबळावर निवडणुकीत उतरलेल्या मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. अविनाश जाधव यांनीही ठाण्यातून निवडणूक लढवली होती. त्यात अविनाश जाधव यांचा पराभव झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दिला. परंतु, राज ठाकरे यांनी तो स्वीकारला नाही. अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीची सविस्तर माहिती अविनाश जाधव यांनी दिली.
ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ठाणे आणि पालघर येथे मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. याची नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला होता. मनसे पक्षाचे नेतेपद, नाविक सेनेचे अध्यक्षपद आहे आणि तिसरे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे अध्यक्षपद आहे. यातील फक्त ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पक्षाचा नेता मी होतोच. राजीनामा दिल्यावर राज ठाकरे यांनी बोलावले होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी तुझीच आहे. तूच या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायचे आहे, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले.
राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करणार
आतापर्यंत राज ठाकरे यांनी जे आदेश दिले, त्याचे पालन केले आहे आणि आता आयुष्यात पुढेही राज ठाकरे यांनी दिलेल्या सर्व आदेशाचे पालन करणार आहे. राजीनामा वगैरे असे काही नसते. काम करत राहायचे असते. यश मिळायचे असेल, तेव्हा मिळेल, असे राज ठाकरे यांनी मला सांगितले. राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून पुन्हा एकदा ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यात मनसे पुन्हा एकदा वाढवणार, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.
माझ्या रक्तात राजकारण आहे
अनेकदा लोक मला फोन करतात. संपर्क साधतात. तेव्हा मी त्यांना नेहमी सांगतो की, माझ्या रक्तात राजकारण आहे. त्यामुळे एखादे पद गेल्यामुळे राज ठाकरे यांच्यावरील माझी निष्ठा कमी होणार नाही किंवा राज ठाकरे यांच्यावरील प्रेम कमी होणार नाही. महाराष्ट्रसैनिक म्हणून त्याच जोशात काम करणार होतो. परंतु, पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहायला सांगितले आहे. पूर्ण ताकदीने लढणार. राज ठाकरे यांच्यासाठी महाराष्ट्रभर फिरणार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढवण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील, त्या करणार, असे अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले. राजीनामा दिल्यानंतर अनेक कार्यकर्ते, नेत्यांचे मला फोन आले. याबाबत चर्चा केली. मला दिलेल्या पाठिंब्याबाबत सर्वांचे आभार मानतो. आपण सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे. राज ठाकरे यांची ताकद वाढवली पाहिजे, अशी सगळ्यांची इच्छा होती. आतापासून पुन्हा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणार आहे, असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणूक काळामध्ये ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्याकडून निवडणुकीतील उमेदवार, तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना योग्य मदत आणि सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप मनसे पालघरचे विक्रमगड तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी केला आहे. पालघरमधील उपजिल्हाध्यक्ष विशाल जाधव, विपुल पटेल यांच्यासह बहुतांश तालुकाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची निवासस्थानी भेट घेतली. याच भेटीमध्ये या पदाधिकाऱ्यांनी पराभवाची मीमांसा करताना आपली गाऱ्हाणी मांडली. अविनाश जाधव यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या भेटीची माहिती अविनाश जाधव यांच्यापर्यंत आल्यानंतर पक्षातून कारवाई होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या सर्वच पार्श्वभूमीवर, काम करताना माझ्याकडून कळत-नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे, अशी आर्जव अविनाश जाधव यांनी पत्रातून राज ठाकरे यांच्याकडे करत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले होते.