भाजपाचे आव्हान स्वीकारले; नाना पटोलेंनी थेट सांगितले, म्हणाले, “...तर राजीनामा द्यायला तयार”
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:02 IST2024-12-05T16:02:35+5:302024-12-05T16:02:59+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: भाजपाचे आव्हान स्वीकारताना नाना पटोले यांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवली आहे. पण त्यासाठी एक मोठी अट ठेवली आहे.

भाजपाचे आव्हान स्वीकारले; नाना पटोलेंनी थेट सांगितले, म्हणाले, “...तर राजीनामा द्यायला तयार”
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर अखेर महायुतीने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. महायुती सरकारच्या शपथविधीचा भव्य सोहळा आझाद मैदानावर होत आहे. यासाठी हजारो लोकांना निमंत्रणे देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी भाजपाकडून देण्यात आलेले आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वीकारल्याचे सांगितले जात आहे.
पाच वर्ष स्वतःच्या मतदारसंघाशी संबंध न ठेवता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ईव्हीएमला दोष देत आहेत. ईव्हीएम ही कॅल्यूलेटरसारखी मशीन आहे, ती हॅक होऊ शकत नाही. विकास नको, रोज टीकाटिप्पणी करणाऱ्या विरोधकाना जनतेने नाकारले असल्याने आता ते ईव्हीएमला दोष देत आहेत. नाना पटोले निष्क्रिय असून त्यांची कार्यपद्धती आणि वागणूकीमुळे काँग्रेस पक्षातीलच नेते नाराज होते. नाना पटोलेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान भाजपा नेते परिणय फुके यांनी दिले होते. याला प्रत्युत्तर देताना नाना पटोले यांनी थेट शब्दांत उत्तर दिले.
...तर राजीनामा द्यायला तयार
बॅलेट पेपरवर मतदान होणार असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असा पलटवार नाना पटोले यांनी आव्हान स्वीकारत केला आहे. भाजपा नेत्याने निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे पत्र आणावे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला आम्ही तयार आहोत, सुरुवात आम्ही आमच्यापासूनच करू. १०० टक्के बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला आम्ही तयार आहोत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, स्वतःचे मत, व्यक्तिमत्व स्वातंत्र्य आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी गावागावात बॅलेट पेपरची मतदान मोहीम राबवा. आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भागवत सप्ताह सुरू होईल. त्या भागवत सप्ताहात ईव्हीएम हटाव, बॅलेट पेपरवर मतदान घ्या, ही स्वाक्षरी मोहीम चालविली पाहिजे, ही राजकीय मोहीम नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले.