EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 06:15 PM2024-11-28T18:15:31+5:302024-11-28T18:15:48+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: जनतेने आम्हाला दिलेला यश महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठ्या मनाने कबूल करावे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 result ncp ap group dhananjay munde give challenge to congress over allegation on evm | EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटून गेले असले तरी अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्याने आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, भाजपाकडून अद्याप याबाबत कोणत्याही निर्णय झालेला नाही. भाजपा धक्कातंत्राचा वापर करणार की, देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच महाविकास आघाडीतील नेते दारूण पराभवाचे खापर ईव्हीएम मशिनवर फोडताना दिसत आहेत. यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर देताना काँग्रेसला आव्हान दिले आहे. 

पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, तुम्ही लोकसभेत जिंकता तेव्हा तुम्हाला जनतेने जिंकवले. तुम्ही विधानसभेत हरता तेव्हा तुमची ईव्हीएममुळे झाले, अशा पद्धतीचा सुरू असलेला भाबडेपणा महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकला आहे. ईव्हीएमबाबत मतदान कसे झाले? उशिरा का झाले? याबाबत बोलण्यात काहीही अर्थ नाही. पराभव मोठ्या मनाने मान्य करावा लागतो. आम्ही लोकसभेच्या निवडणुकीनंतर पराभव मान्य केला. तेव्हा ईव्हीएम वगैरे बोललो नाही. त्या पराभवानंतर पुन्हा जनसेवा केली आणि जनसेवेनंतर विधानसभेला जनतेने अभूतपूर्व यश महायुतीला दिले. जनतेने आम्हाला दिलेला यश महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठ्या मनाने कबूल करावे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

जेवढी लाज राहिली आहे तेवढी तरी त्यांनी राखावी

२०२९ मध्ये शिंदे, पवार राजकारणातून हद्दपार होतील, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली होती. यावर बोलताना, काँग्रेसचे नेते जे म्हणत आहेत किंवा आरोप करत आहेत, त्यांची काय अवस्था झाली, हे त्यांनी एकदा बघावे. ते कुठून कुठपर्यंत आले आहेत. त्यांनी जेवढी लाज राहिली आहे तेवढी तरी त्यांनी राखावी. ते २०२९ चे सांगत आहेत. तुम्हाला महाराष्ट्रातील मायबाप जनतेने जो धडा शिकवला, त्याबाबतीत बोला ना, असे आव्हान धनंजय मुंडे यांनी दिले. 

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे. मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढल्याचे प्रमाण पाहता मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदार संघावर अशा रांगा लागल्या होत्या ते निवडणूक आयोगाने पुराव्यासह दाखवावे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर CCTV लावले होते, त्याचे चित्रिकरण दाखवावे. मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असते, यावेळी आयोगाने पत्रकार परिषद का घेतली नाही. यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून राजकीय पक्ष, उमेदवार वा इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे. भाजपा व निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे. विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीसंदर्भात काँग्रेस न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 result ncp ap group dhananjay munde give challenge to congress over allegation on evm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.