Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटून गेले असले तरी अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्याने आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, भाजपाकडून अद्याप याबाबत कोणत्याही निर्णय झालेला नाही. भाजपा धक्कातंत्राचा वापर करणार की, देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच शिवसेना शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
महायुतीला मोठा कौल मिळाला आहे. येत्या २ दिवसांत महायुतीचे सरकार बनेल. महाराष्ट्रातील जनतेने १८ ते २० तास महाराष्ट्रात काम करणारा मुख्यमंत्री पाहिला. ते व्यक्तिमत्त्व म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत. गेल्या वेळेस आमचा आकडा कमी असताना आम्हाला भाजपाच्या वरिष्ठांनी संधी दिली. आता भाजपाचे १३० हून अधिक आमदार स्वतःचे आहे. त्यामुळे आम्ही किती मागावे? काय मागावे? याचे भान ठेवले पाहिजे, असा सूचक सल्ला रामदास कदम यांनी दिला.
लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील
आम्हा सर्वांचीच इच्छा आहे की, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. परंतु भाजपलाही त्यांचा पक्ष चालवायचा आहे. त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. महायुतीमध्ये कुठलाही मतभेद नाहीत. एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या कुटुंबाला घेऊन देश सोडून जातील, असे माझे शब्द आहेत. तुमच्याकडे लिहून ठेवा. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी बेईमानी केली. शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी जे पाप केले. त्या पापाचे प्रायश्चित्त उद्धव ठाकरेंना भोगावेच लागेल, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
दरम्यान, लोकसभेत त्यांना जास्त जागा मिळाल्या. जास्त खासदार निवडून आले. तेव्हा त्यांनी ईव्हीएम मशीनवर कुठे खापर फोडले का? नाही ना. मग आता विधानसभेत महायुतीच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे त्यांना कारण हवे आहे. बाजूने निकाल लागला की मशीन चांगले आणि विरोधात निकाल लागला की मशीन वाईट, असा कसा तुमचा निकष आहे, अशी टीका रामदास कदम यांनी मविआ नेत्यांवर केली.