Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला. अविश्वसनीय, अनाकलनीय आणि अस्वीकार्ह निकाल असल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून देण्यात आली. महायुतीच्या त्सुनामीत महाविकास आघाडीचा मोठा धुव्वा उडाला. महाविकास आघाडीला आता विरोधी पक्षनेता बसवणेही शक्य होणार नाही. परंतु, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाने दावा केला आहे. यासाठी ठाकरे गट आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर सर्वच पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाची मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भास्कर जाधव गटनेते असणार आहेत. विशेष म्हणजे विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे संयुक्त नेते म्हणून आदित्य ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचे जास्त असल्याने अर्थात विरोधी पक्ष नेता आमचा होईल, असे भास्कर जाधव यांनी ठामपणे सांगितले. परंतु, याबाबत कायदा काय सांगतो?
मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
विरोधी पक्षनेतेपदाबाबत नियम किंवा कायदा काय सांगतो, यावर राज्याचे माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी माहिती दिली आहे. कायद्यात याबाबत कोणताही नियम नाही. परंतु, मागील प्रकरणांचे उदाहरण घेता, विरोधी पक्षनेता होण्यासाठी पक्षाकडे १० टक्के जागा असायला हव्यात. पण संपूर्ण आघाडीचा असा एक नेता नेमण्याचा नियम कायद्यात नाही. पण असा नेता नेमायचाच असेल तर विधानसभेचे सभापती त्यावर निर्णय घेऊ शकतात, असे श्रीहरी अणे यांनी सांगितले. तसेच ठाकरे गट आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतल्याचे सांगितले जात आहे. यावर बोलताना, असा कोणताही नियम नाही. हा केवळ दबाव निर्माण करण्याचा मार्ग आहे. कारण कोणताही नेता त्याच्या पक्षाच्या व्हीपने आधीच बांधील असतो आणि त्याने पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास पक्ष त्याच्यावर कारवाई करू शकतो. यासाठी प्रतिज्ञापत्राची गरज काय, असा उलट प्रश्न अणे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, विधानसभेतल्या विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीसाठी त्या पक्षाकडे विधानसभेतील एकूण जागांपैकी १० टक्के आमदारांची गरज असते. आताच्या विधानसभेत ती संख्या किमान २९ आमदार असणे आवश्यक आहे. महाविकास आघाडीच्या एकाही पक्षाकडे २९ आमदार नाहीत. ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १० जागांवर विजय मिळाला आहे.