Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्कादायक होते. महाविकास आघाडीचे नेते अद्यापही त्यातून सावरताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत आहे. नवे सरकार कधी स्थापन होणार, मंत्रिमंडळ कसे असणार, कोणाकडे कोणती खाती जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच संजय राऊत यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
महायुतीतील अनेक नेते प्रचंड मतांनी विजयी झाले. तर महाविकास आघाडीतील दिग्गज पडले. यानंतर आता विरोधकांनी ईव्हीएम घोळाचा आरोप केला आहे. अनेक ठिकाणचे आकडे सोशल मीडियावर शेअर करत गोंधळ असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे चांगल्या मताधिक्क्याने निवडून आले. यानंतर आता धनजंय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील काही मतदान केंद्रावर राडा झाल्याचे पाहायला मिळाले. धनंजय मुंडेंच्या गुंडांनी लोकशाहीला पायदळी तुडवत हुकूमशाही पद्धतीने मतदान यंत्रणा कामाला लावल्याचा आरोप विरोधकांनी केला. हाच मुद्दा पकडून संजय राऊत यांनी एक व्हिडिओ एक्सवर शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का?
लोकशाहीतील विचलित करणारे हे दृश्य आहे परळी मतदार संघातील. अशा प्रकारच्या निवडणुका पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये सुद्धा होत नसतील. मतदाराना केंद्रावर येऊच दिले नाही. दहशत माजवून पळवून लावले. निवडणूक आयोग जिवंत आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोग, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनीही मुंडेंवर आरोप करत मतदान केंद्रांवर बोगस मतदान होत असल्याचे म्हटले होते. परळी मतदारसंघातील या घटनेचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियातून समोर आले.