Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. यावर संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. कोणत्या जागेवरील उमेदवार पाडण्याचे याबाबतही सांगितले होते. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. या घडामोडींवर संभाजीराजे यांनी भाष्य केले.
एक आंदोलन दीड वर्षे टिकणे ही ऐतिहासिक बाब आहे
मनोज जरांगे पाटील यांची भूमिका पूर्वीपासून हीच होती की, आपले उमेदवार विधानसभेत पाठवावेत. विधानसभेच्या पटलावर आपला माणूस गेल्याशिवाय आपली भूमिका मांडू शकत नाही. ही माझीही भूमिका होती. त्यामुळे त्यांनी आता जो निर्णय घेतला त्यामागे अनेक कारणे असतील. ही कारणे समाजहिताची असतील. वर्षभर आंदोलन केले, त्यामुळे आंदोलनाला ग्रीप मिळाली. एक आंदोलन दीड वर्षे टिकणे ही ऐतिहासिक बाब आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
दरम्यान, मनोज जरांगे यांची पार्श्वभूमी पाहिली तर त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव आलेला नाही. त्यांनी नेहमीच परखड भूमिका मांडलेली आहे. माघार हा शब्द चुकीचा आहे. समाजाच्या दृष्टीकोनातून समाजाला काय गरजेचे आहे, समाजाला वेठीस धरून काय करू नये, अशा मताचे ते असून यामागे त्यांचा हाच दृष्टीकोन असेल, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.