मावळ - महायुतीत मावळ मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा सुनील शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या उमेदवारीला मावळमधील भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे. येणार्या विधानसभा निवडणुकीत सुनील शेळकेंचा पराभव करणे आणि बापू भेगडे यांना निवडणुकीत निवडून आणण्याचा निर्धार माजी मंत्री बाळा भेगडे यांनी घेतला आहे.
मावळमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर बाळा भेगडे म्हणाले की, मावळची जनता आणि भाजपा कार्यकर्त्याची ताकद ही येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल. निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता काय असतो हे मावळ जनतेच्या आशीर्वादातून प्राप्त होईल. मी योग्य वेळी योग्य प्रयोग करेन. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व किल्ले जिंकले, त्यांची आदर्श भूमिका मावळचे मावळे म्हणून आम्ही स्वीकारली आहे. आम्ही आमच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मावळ तालुक्यातील भाजपा टिकली पाहिजे या भूमिकेतून आम्ही कामाला लागलो आहोत असं त्यांनी सांगितले.
तसेच हा केवळ विधानसभेपुरता विषय नाही. ५ वर्ष आम्ही जे भोगलंय, कार्यकर्त्यांनी जे सहन केलंय त्याची प्रचिती म्हणून हे होतेय. अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना मावळच्या जनतेच्या आशीर्वादावर निवडून आणणं एवढेच आमचे लक्ष्य आहे असं बाळा भेगडे यांनी म्हटलं. तर सुनील शेळकेंना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी राजीनामा दिला. पक्षाच्या स्थापनेपासून मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. तालुक्यात काँग्रेस रुजवणारं माझं कुटुंब आहे. आम्ही सगळे निष्ठावंत मंडळी, दादांना कल्पना आहे. मी अपक्ष निवडणुकीत उभा राहणार आहे. जनतेच्या विश्वासावर मी हा निर्णय घेतला आहे असं बापू भेगडेंनी सांगितले.
दरम्यान, महायुतीत ही जागा आम्हाला सुटावी यासाठी अजितदादा आग्रही होते. एकदा निर्णय झाल्यानंतर भाजपा नेते आणि कार्यकर्ते पक्षाचं काम करतात. कारण मीदेखील त्या पक्षात काम केले आहे. आम्ही एकत्रितपणे काम केले आहे. महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार नाही. आमच्यातलाच कुणीतरी उमेदवार मिळावा यासाठी ते प्रयत्न करतायेत. महायुतीतील इच्छुक जर कुणी उभं करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही नाराजांची समजूत काढू असं सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिली.