Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. आश्वासने, शब्द, गॅरंटी, वचने दिली जात आहे. केंद्रातील नेते, पदाधिकारी राज्यात येऊन प्रचार करत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच मुख्यमंत्रीपदाबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. ऐन प्रचारातही मुख्यमंत्री कोण होणार, हा मुद्दा चांगलाच गाजताना पाहायला मिळत आहे.
निवडणुकांचे पडघम वाजू लागताच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, असा आग्रह धरला होता. परंतु, महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच निवडणूक निकालानंतर त्यावर चर्चा करून निर्णय करू, असेच सांगत राहिले. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत अनेक नेते आणि त्यांचे कार्यकर्ते दावे करताना पाहायला मिळाले. सुप्रिया सुळे यांच्यापासून ते नाना पटोलेंपर्यंत अनेकांचे बॅनर भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले. यातच आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचारातही भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सूतोवाच करत पुन्हा एकदा चर्चांना द्वारे खुली करून दिली. यानंतर आता शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला स्पष्ट करत सगळ्या सस्पेन्सला पूर्णविराम दिल्याचे सांगितले जात आहे.
मविआतील मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरला?
महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. आम्ही महाविकास आघाडीतील नेतेमंडळी बसून यावर चर्चा करू. जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल त्यांचा नेता मुख्यमंत्री होईल. ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा येतील, आम्ही त्यांना विनंती करू की तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडा, आमचा त्याला संपूर्ण पाठिंबा असेल. याचाच अर्थ ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल. माझ्या पक्षाचे हेच धोरण आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आणि महाविकास आघाडीची सत्ता आल्यास कोणाचा मुख्यमंत्री होणार, या चर्चांना एक प्रकारे स्पष्ट उत्तर दिल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार एका मुलाखतीत बोलत होते.
दरम्यान, आम्हाला राज्यात स्पष्ट चित्र दिसत आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल. सध्या राज्यात मविआला अनुकूल वातावरण आहे. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली. त्यावेळी जनतेने त्यांच्या मनात काय आहे ते स्पष्ट सांगितले. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणूक झाली होती, तेव्हा काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली होती, तर आम्ही चार जागा जिंकल्या होत्या. आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने तब्बल ३१ जागा जिंकल्या. यावरून लोकांचा कल काय आहे ते स्पष्ट झाले, असे शरद पवार यांनी नमूद केले.