Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला ठाकरे गटानेही प्रचारावर भर दिला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करत प्रचारसभा घेत आहेत. सोमवारी वणी येथील हेलिपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. लगेचच मंगळवारी औसा येथील हेलिपॅडवर निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी केली. सलग दोन दिवस उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी झाल्यावर राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
वणी येथे ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. यावरून ठाकरे यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला. आतापर्यंत कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या, असा सवाल ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केला आहे. योगायोग म्हणजे उद्धव ठाकरे हेच प्रथम या दोन्ही मतदारसंघांत हेलिकॉप्टरने पोहोचले आहेत. यामुळे अधिकाऱ्यांनीही ठाकरेंना जशासतसे उत्तर देत तुम्हीच पहिले आहात, असे सांगितले. यावर ठाकरेंनीही मीच पहिला गिऱ्हाईक का, असा सवाल केला. याचा व्हिडिओ ठाकरेंनीच शूट करून सोशल व्हायरल केला आहे. यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सवाल केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?
उद्धव ठाकरे यांच्या बॅगेत असे काय आहे, एवढी आगपाखड करायचे कारण काय, असा सवाल करत लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगाही तपासण्यात आल्या होत्या. पण मुख्यमंत्री शिंदे यांनी असा व्हिडिओ कधी शेअर केला नाही की असे प्रश्न विचारले नाहीत. ही एक प्रोसिजर आहे आणि त्यांनी सहकार्य करायला पाहिजे, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली.
दरम्यान, निवडणूक आयोगाने याची दखल घेतली असून यंत्रणा नियमावलीनुसार आपले काम करत असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत २४ एप्रिल २०२४ रोजी बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली होती आणि २१ एप्रिल २०२४ रोजी बिहारच्या कटिहार जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली होती, असे स्पष्टीकरण आयोगाने दिले आहे.