Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीत सुरू असलेला वाद अद्यापही शमला नाही. तीनही पक्षांना प्रत्येकी ८५ जागांच्या वाटपाची घोषणा केल्यानंतर राहिलेल्या जागांचा वाद संपेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ६ जागांवरील तिढा कायम आहे. एकीकडे हा घोळ सुरू असताना तिकडे दिल्लीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मविआतील ९०-९०-९० चा नव्या फॉर्म्युल्याची घोषणा केली. तीन पक्ष मिळून २७० जागा लढवणार असून उरलेल्या १८ जागा लहान मित्र पक्षांना देऊन त्यांचे समाधान केले जाईल, असे थोरात यांनी सांगितले. यातच आता महाविकास आघाडीतील मित्रपक्षाने उशीर होत असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. तसेच अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर वेगळा विचार करण्याचा इशारा दिला आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. २५ जागा मिळाल्या तर ठीक आहे. याआधी काँग्रेसने मला दोनवेळा दगा दिला आहे. एक दोन दिवस राहिले की, दगा दिला जातो. मला एक दिवसाची वेळ दिली आहे. २६ तारखेपर्यंत आमच्या ५ उमेदवारांची यादी आणि आणखी एक दोन जागा देण्यात आल्या नाहीत, तर २५ ते ३० उमेदवार जाहीर करेन आणि त्यांना स्वतंत्रपणे लढवेन, असा थेट इशारा अबू आझमी यांनी महाविकास आघाडीला दिला.
शरद पवारांशी चर्चा केली, तेच योग्य नेते आहेत
शरद पवारांशी चर्चा केली. शरद पवारच योग्य नेते आहेत. कारण इतर दोन पक्षात दुसरे कुणीही त्यांच्या इतके मोठे नाही, असे सांगत दिल्लीतील काँग्रेस नेते काय करत आहेत? राज्यातील नेते दिल्लीत कशाला जातात? राज्यातील नेत्यांना अधिकार द्यायचे नसतील तर त्या काँग्रेसच्या नेत्यांना अध्यक्ष कशाला केले आहे? मी सपाचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. माझ्याकडे एबी फॉर्म आहेत. मी ज्याला हवे त्याला ते देऊ शकतो. काँग्रेसला निर्णय घेता येत नाहीत म्हणूनच त्यांचा पराभव होतो, अशी बोचरी टीका अबू आझमी यांनी केली.
दरम्यान, सन्मानाने बोलू आणि विषय संपवू, असे शरद पवार यांनी सांगितले, अशी माहिती देत, आंबेडकरवादी, आदिवासी विचारांचे लोक भाजपला मतदान करत नाहीत. स्वतंत्र झालो तर मी २५ उमेदवार देणार, असे आझमी यांनी स्पष्ट केले. झिशान सिद्दिकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला अन् त्यांना उमेदवारीही जाहीर झाली. यावर बोलताना, निवडून आले आणि वफ्फ बोर्ड बिल आल्यावर काय म्हणणार? आपल्या लोकांच्या विरोधात उभे राहणार का? असा सवाल आझमी यांनी केला.