Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पुढे जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांची धावपळ होताना पाहायला मिळाली. अनेक ठिकाणच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. परंतु, काही ठिकाणी बंडखोरांनी बंडाचा झेंडा कायम ठेवत निवडणूक लढण्याचा निर्धार कायम ठेवल्याचे दिसले. यातच भावाविरोधात बहिणीने उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु, वडिलांनी एक कायदेशीर नोटीस बजावली. यानंतर बहिणीने उमेदवारी मागे घेऊन भावाला दिलासा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बहिणीने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ठाकरे गटाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून चक्क भावाविरुद्ध बहिणीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत मशाल हाती घेतली होती. त्यानंतर, शिवसेना ठाकरे पक्षाकडून त्यांच्या मुलाला विधानसभेची उमेदवारीही जाहीर झाली. मात्र, येथून त्यांच्या बहिणीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बबनराव घोलप यांनी राजीनामा देत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पण, त्यांच्या कन्या तनुजा घोलप यांनी महायुतीसोबतच राहणे पसंत केले. तुनजा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने त्यांना कौटुंबिक कलहाचा सामना करावा लागला होता.
वडिलांनी बजावली होती कायदेशीर नोटीस
राजकारणातील ईर्षेमुळे वडील बबनराव घोलप यांना लहान कन्येला नोटीस पाठवावी लागली. लग्न झाले असल्याने माहेरचे नाव न वापरता सासरकडील नाव वापरावे, अशी जाहीर नोटीस देण्याची वेळ घोलप यांच्यावर आली. धाकटी मुलगी तनुजा निलेश भोईर हिने वडील बबनराव घोलप यांना राजकीय धक्का देत भाजपामध्ये प्रवेश केला. तनुजा यांना आमदारकीचे स्वप्न पडू लागल्याने दोघे पती-पत्नी गत ३ वर्षापासून मतदारसंघात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत होते. राजकीय ईर्षेपोटी वाढत चाललेला कलह न मिटता वाढतच गेल्याने अखेर तनुजा हिने देवळाली मतदारसंघातून अपक्ष व एक प्रकारे भाऊ योगेश विरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, आता उमेदवारी अर्ज मागे घेतला.
दरम्यान, अर्ज माघारी घेताना तनुजा घोलप भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. माझ्या भावाला निवडणुकीसाठी बहीण म्हणून शुभेच्छा देते. मात्र, महायुतीतच राहून महायुतीचे काम करणार असल्याची भूमिका तनुजा घोलप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर व्यक्त केली. माझ्या जन्मदाखल्यावर आजही तनुजा बबनराव घोलप नाव असल्याने तेच वापरणार असल्याची तनुजा घोलप यांची भूमिका आहे. वडिलांनी केलेल्या टीकेला कुठलेही उत्तर देणार नाही, पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आश्वासनानंतरच आपण माघार घेत असल्याचे तनुजा घोलप यांनी स्पष्ट केले.