तात्यासाहेबांचे घर फोडले? मी तेव्हा १४ वर्षांचा अन् दादा १८; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांना प्रत्यूत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 01:52 PM2024-10-29T13:52:23+5:302024-10-29T13:53:23+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आता माघार नाही, अजित पवार यांनी घातलेला घाव विसरता येणार नाही - श्रीनिवास पवार
बारामती विधानसभेचा अर्ज भरल्यानंतर अजित पवारांनीशरद पवारांवर आरोप करत त्यांनी तात्यासाहेबांचे घर फोडल्याचे प्रश्न विचारत म्हटले आहे. यावरून अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. अजित पवार सोमवारी भावुक झाले होते. यावर श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांनी चूक मान्य केली असली, तरीदेखील आता माघार नाही. युगेंद्र पवार यांची उमेदवारी कायम आहे. अजित पवार यांनी घातलेला घाव विसरता येणार नाही, असे स्पष्ट केले होते.
आता आज पुन्हा श्रीनिवास पवार यांनी तात्यासाहेबांचे घर फोडले या आरोपावर अजित पवारांना त्या काळाची आठवण करून दिली आहे. अजित पवारांचा हा फार चुकीचा आणि दुर्दैवी आरोप आहे. त्यांचे वक्तव्य ऐकून मला वाईट वाटले आहे. माझे वडील गेले तेव्हा मी १४ आणि दादा १८ वर्षांचा होता. शरद पवारांना आम्ही तात्यासाहेबांच्या जागी पाहिले. आताही पाहत राहू. शरद पवारांवर असा आरोप करणे अत्यंत दुर्दैवी आहे, असे श्रीनिवास म्हणाले.
शरद पवारांनी ३० वर्षे बारामती सांभाळली, पुढे अजित पवारांकडे दिली, त्यांनी ३० वर्षे सांभाळली. आता नव्या पिढीकडे द्यायला हवी. अजित पवारांनी युगेंद्रला उमेदवारी मागे घेण्यास सांगितले तसे मी दादाला सांगणार नाही. प्रत्येकाने आपापला विचार करावा. भावनिक करतील असे आरोप करून आपणच भावनिक व्हायचे आणि कुटुंबाला मध्ये आणायचे हे बरोबर नाही, अशी टीका श्रीनिवास पवार यांनी केली. कुटुंबातील चार गोष्टी चार चौकटीतच रहायला हव्यात हे आपणच सांगत फिरायचे आणि या गोष्टी आपणच लोकांना सांगून मोकळे व्हायचे, हे बरोबर नाही, असेही ते म्हणाले.
अजित पवार काय म्हणालेले...
आई सांगतेय, माझ्या दादाच्या विरोधात कोणीही फॉर्म भरू नका. या पद्धतीने जे चाललंय ते बरोबर नाही. मग, याबाबत कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने यामध्ये सांगायला पाहिजे होते. त्यांना फाॅर्म भरायला कोणी सांगितला होता, ‘साहेबां’नी सांगितले, मग आता साहेबांनी तात्यासाहेबांचे घर फोडले, असे म्हणायचे का? या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला; यावेळी अजित पवार यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.