Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी शेवटचे काही तास राहिले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे राज्यातील आणि केंद्रातील नेते जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेसचे तेलंगणधील मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी नांदेड येथील प्रचारसभेत बोलताना अजब आवाहन केल्याचे पाहायला मिळत आहे.
ऑटोरिक्षा चालवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रिपद दिले. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, अजित पवार यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्या काँग्रेसने अशोक चव्हाण यांना दोन वेळा मुख्यमंत्री केले त्यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका रेड्डी यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही येथील स्थानिक आहात. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. त्यांनी किती अमाप संपत्ती कमावली आहे हे त्यांनाही माहिती नसेल. त्यांचे मेहनतीचे पैसे नाहीत. त्यांचे पैसे घ्या पण मत काँग्रेसच्या उमेदवारालाच करा. त्यांनी काही घाम गाळून पैसे कमावले नाहीत. त्यांच्या खिशातूनही पैसे काढून घ्या, ते ही कमी पडले तर त्यांच्या घरी जाऊन ज्या वस्तू आहेत त्या घेऊन टाका, परंतु मतदान काँग्रेसच्या उमेदवाराला करा, असे आवाहन प्रचारसभेत बोलताना केले.
धोकेबाजांना धडा शिकवायचा आहे
आता विधानसभा निवडणुकीत धोकेबाजांना धडा शिकवायचा आहे. अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री केले. खासदार केले, अशोक चव्हाण यांच्या वडिलांनाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले. दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जी जी म्हणून पदे होती, ती सगळी अशोक चव्हाण यांना काँग्रेसने दिली. अशोक चव्हाण यांना गांधी परिवाराने सगळे काही दिले. परंतु, त्यांनी गांधी परिवाराला फसवले. पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका रेवंथ रेड्डी यांनी केली.
दरम्यान, निवडणुकीत प्रामाणिक उमेदवार जिंकणे महत्त्वाचा आहे. खोटारड्यांची देशाचा स्पर्धा आहे. मोदींना पराभूत करायचे आहे , अशोक चव्हाण यांना हरवायचे आहे, राजकारणात अशोक चव्हाण दिसू नये, कारण त्यांनी तुमचे नाव खराब केले, या शब्दांत निशाणा साधत, तेलंगण सरकारने दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या , आम्ही कर्जमाफी केली, नोकऱ्या दिल्या. ५० हजार नोकऱ्या दिल्या. भाजपाला आव्हान आहे, येऊन मोजा. एक नोकरी तरी कमी दिसली तर मी जाहीर माफी मागतो, असे आव्हान रेवंथ रेड्डी यांनी केले.