Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी महाराष्ट्रात तळ ठोकला असून, प्रचारसभा, पत्रकार परिषदा यांवर भर देताना दिसत आहेत. यातच आरक्षणात मुस्लीम कोटा देण्याबाबत महाविकास आघाडीचे सरकार आल्यास चर्चा करू, असे सांगत तेलंगणमधील स्थितीवर भाष्य केले.
पत्रकारांशी बोलताना रेवंथ रेड्डी यांना मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना रेवंथ रेड्डी यांनी सांगितले की, तेलंगणामध्ये आम्ही चार टक्के कोटा दिला आहे. महाराष्ट्रात याबाबतचा निर्णय आम्ही घेऊ. आम्ही वाय. एस. राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री असताना सोनिया गांधींच्या नेतृत्वात ४ टक्के कोटा देण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही ११ हजार शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या तेव्हा ७२० मुस्लिम शिक्षकांना नोकरी मिळाली होती. आमचे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर आम्ही विधानसभेत आरक्षणात मुस्लिम कोटा ठेवण्याबाबत चर्चा करणार आहोत, असे रेवंथ रेड्डी यांनी म्हटले आहे.
न्याय आणि हक्क प्रत्येकाला मिळाले पाहिजेत
पुढे बोलताना रेवंथ रेड्डी यांनी सांगितले की, न्याय आणि हक्क प्रत्येकाला मिळाले पाहिजेत, यात शंकाच नाही. त्यामुळेच राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली होती, असे सांगत, शरद पवारांनी मुलीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पद दिले नाही. उलट पुतण्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिले. तरी अजित पवार यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि मोंदीचे गुलाम झाले. अशोक चव्हाण यांनाही काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिले त्यांच्या वडिलांनाही मुख्यमंत्री केले. त्यांनीही पाठीत खंजीर खुपसला आणि मोदींचे गुलाम झाले, अशी टीका रेवंथ रेड्डी यांनी केली.
दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीत धोकेबाजांना धडा शिकवायचा आहे. निवडणुकीत प्रामाणिक उमेदवार जिंकणे महत्त्वाचा आहे. खोटारड्यांची देशाचा स्पर्धा आहे. तेलंगण सरकारने दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या , आम्ही कर्जमाफी केली, नोकऱ्या दिल्या. ५० हजार नोकऱ्या दिल्या. भाजपाला आव्हान आहे, येऊन मोजा. एक नोकरी तरी कमी दिसली तर मी जाहीर माफी मागतो, असे आव्हान रेवंथ रेड्डी यांनी दिले.