Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Bitcoin Scam: एकीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया होत असताना दुसरीकडे बिटकॉइन स्कॅमचा मुद्दा चांगलाच गाजताना पाहायला मिळत आहे. माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन वापरणे तसेच निवडणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला आहे. यानंतर भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही काही ऑडिओ क्लिप शेअर करत आरोप केले. भाजपा आणि आयपीएस अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले आरोप नाना पटोले यांनी फेटाळून लावले आहेत.
पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र माझा आवाज ओळखतो. अशा क्लिपमुळे लोक भाजपावरच हसत आहेत. भाजपाने उभा केलेला तोतया आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील याला ओळखत नाही. सर्व आरोपांचे खंडन करतो. आम्ही त्यांच्याविरोदात एफआयआर दाखल केला असून मानहानीचा दावा ठोकला आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता महाविकास आघाडीच्या बाजूने उभी असून, 'मविआ'चेच सरकार स्थापन होणार याविषयी मला पूर्ण खात्री आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, मतदानाच्या दिवशी माध्यमांना हाताशी धरून बिटकॉइन प्रकरणी माझ्यावर खोटे आरोप करून काँग्रेस पक्षाची व माझी बदनामी करण्याचा खोडसाळपणा भाजपाने केला आहे. माध्यमांनी या प्रकरणाची व्यवस्थित माहिती घेऊन वार्तांकन केले पाहिजे. दुर्देवाने भाजपच्या इशाऱ्यावर आमची बदनामी करण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरु आहे. तो तत्काळ थांबवावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही, असा थेट इशारा नाना पटोले यांनी दिला.
दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरारच्या हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडले गेले. तावडेंचा तो मतदारसंघ नसताना ते तेथे काय करत होते? कार्यकर्त्यांना भेटायला गेलो हा तावडेंचा बचाव चुकीचा आहे. प्रचार संपल्यानंतर मतदारसंघाबाहेरच्या नेत्यांना थांबता येत नाही असा नियम आहे, त्यामुळे विनोद तावडे जे सांगत आहेत ते खोटे आहे. आर्वी विधानसभेचे भाजपा उमेदवार वानखेडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक आहेत, या वानखेडेंच्या गोदामात दारुच्या बाटल्यांचा साठा सापडल्या. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असतानाही हा दारु साठा कसा आला? मतदारांना पैसे व दारु वाटून भाजपाचा मते मिळवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.