संजय आवटे, लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी (जि. जालना) : २००४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही मी मुख्यमंत्रिपद कॉंग्रेसकडे दिले. तेव्हा ‘सिनिअर’ म्हणून माझ्यापुढे नाव होतं छगन भुजबळांचं. भुजबळांचं नंतरचं राजकारण तुम्ही बघा. त्यांना तुरूंगात जावं लागलं. त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं, तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत शरद पवारांनी अनेक प्रश्नांवर विस्ताराने चर्चा केली.
२००४मध्ये काय झाले?‘२००४मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपद घेतलं नाही’, अशी सल अजित पवारांनी अनेकदा बोलून दाखवली, त्याबाबत शरद पवार म्हणाले, “अजित पवारांचा तेव्हा मुद्दाच नव्हता. आम्ही अधिक मंत्रिपदे घेतली. माझे अनेक तरूण सहकारी मंत्री झाले. आर. आर. पाटील, अजित पवार, जयंत पाटील हे तरूण पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले. नव्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी ते गरजेचे होते. शिवाय, विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्यांचा पक्ष वेगळा असला तरी आम्ही सर्वजण गांधी- नेहरू विचारधारेचे पाइक असल्याने ते अधिक योग्य झाले.” ओबीसींनाही सत्तेत स्थान मिळावे, या मताचा असल्यानेच भुजबळांना बळ दिले.
प्रश्न : महाराष्ट्राचा सध्याचा कल कसा आहे, असं वाटतं?शरद पवार : महाराष्ट्राचं चित्र भाजपविरोधी आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी ‘चारशे पार’ची तयारी केली होती. मात्र, त्यातून एक वेगळा संदेश दिला गेला. ‘चारशे पार’ कशासाठी तर संविधान बदलण्यासाठी, असे भाजपच्याच नेत्यांनी सांगितले. त्यामुळे ‘चारशे पार’ हे संविधानाशी जोडले गेले. त्याचा परिणाम काय झाला, हे आपण निकालात पाहिले. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे हादरून गेलेले नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्रात प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे. त्यातूनच भाजपने विरोधकांवर अशोभनीय असे हल्ले सुरू केले आहेत. काल अमित शाह म्हणाले की, शरद पवारांनी दहा वर्षे केंद्रीय मंत्री म्हणून काय काम केले? आता मी केंद्रीय मंत्रिपद सोडून दहा वर्षे झाली. गेली दहा वर्षे तुमचे सरकार आहे. देशात आणि मधला अपवाद वगळता राज्यातही. त्यामुळे या चुकांबद्दल स्पष्टीकरण त्यांनी दिले पाहिजे. प्रश्न : महाराष्ट्रात काय चुकतंय?शरद पवार : यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सर्व नेत्यांनी महाराष्ट्राचा साकल्याने विचार केला. कारखानदारी कशी वाढेल, विकेंद्रीकरण कसे होईल, नाशिक, औरंगाबाद, पुणे, नागपूर ही औद्योगिकरणाची केंद्रे कशी होतील, याची काळजी घेतली गेली. अलिकडच्या काळात लोकांच्या एक गोष्ट लक्षात येऊ लागली आहे. महाराष्ट्रात हाताला काम देण्यासाठी आणि अर्थकारणाला गती देण्यासाठी ज्या प्रकारे परदेशी गुंतवणूक वाढायला हवी, तसे न करता, गुजरातसारख्या राज्यात प्रकल्प गेले. त्यावर ‘लाडकी बहीण’ हे उत्तर असू शकत नाही. इतर योजनांचा निधी तिकडे वळवला गेला. प्रश्न : अजित पवार म्हणतात, “आम्ही पंधराशे दिले की तुम्हाला त्रास होतो. मग तुम्ही तीन हजार देण्याचे आश्वासन कसे देता?”शरद पवार : विरोध या योजनेला नाही. आम्ही आश्वासन दिले तर अंदाजपत्रकात तशी तरतूद करू. असा इतर निधी तिकडे वळवणार नाही. लोकसभेत फटका बसला म्हणून यांना बहीण-भाऊ, शेतकरी आठवले. प्रश्न : अनिल देशमुखांचे आत्मचरित्र नुकतेच वाचले. आता राजदीप सरदेसाईंच्या ताज्या पुस्तकातही काही उल्लेख आहेत. शरद पवार : सरदेसाई मला नुकतेच भेटले. भुजबळ आता नाकारत असले तरी ते काय बोलले, ते सरदेसाई सांगत आहेत. ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेलो. एकदा तुरूंग पाहिला होता. पुन्हा नको, म्हणून भाजपसोबत गेल्याचे त्यांनी सांगितलेले दिसते. नोटिसा आल्याने अजित पवारही अस्वस्थ होते. त्या भीतीने हे तिकडे गेले. त्याला एक आधार आहे. हे तिकडे जाण्याच्या दोनच दिवस अगोदर पंतप्रधान या भ्रष्टाचाराविषयी बोलले होते. ‘यांची चौकशी करणार’, असे म्हटले होते. त्यामुळे अस्वस्थता वाढली असावी. प्रश्न : ते कोणीच तुमच्याशी बोलले नाहीत?शरद पवार : दोन-तीनदा चर्चा झाली. यशवंतराव चव्हाण सेंटरला असताना हे सर्व चाळीसेक जण भेटायला आले. आपण सर्वजण भाजपसोबत जाऊ, असे म्हणाले. तुम्हाला घेऊन यायला सांगितलेय, असेही सांगितले. मी त्यांना सांगितले, मला शक्य नाही. तुम्ही त्यांच्यासोबत गेल्याने फाइल टेबलावरून कपाटात जाईल. पण, ती नष्ट नाही होणार. कारवाईची टांगती तलवार आहेच. त्यापेक्षा संघर्ष करू. अजित पवारांनाही मी सल्ला दिला होता की, भाजपच्या विरोधात लोकांनी आपल्याला कौल दिला आहे. तो नाकारता येणार नाही. प्रश्न : तुम्हाला सोडून गेले, ते गद्दार. मग, इतर पक्षातून जे तुमच्याकडे आले, त्यांना तुम्हीही उमेदवारी दिली. हर्षवर्धन पाटील, समरजित घाटगे, असे बरेच. तिकडे निलेश लंके, अमर काळे खासदार झाले. तिथे विधानसभेला त्यांच्या पत्नीला उमेदवारी. अशाने मूलभूत परिवर्तन कसे होणार? शरद पवार : काही ठिकाणी लोकांच्या आग्रहाखातर अशी उमेदवारी दिली गेली, हे तुम्ही जे म्हणता आहात, ती वस्तुस्थिती आहे. निलेश लंकेंच्या पत्नीला उमेदवारी दिली कारण ती कार्यकर्ती आहे. दुसरीकडे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये अस्वस्थ होते. त्यांची चूक त्यांना समजली होती. ते कारखाना महासंघाचे अध्यक्ष असल्याने आमच्यात सुसंवाद होता. त्यातून असे निर्णय घेतले. कागलमध्ये तसेच होते. प्रश्न : महाराष्ट्राचा ‘हरयाणा’ होईल का?शरद पवार : अजिबात नाही. हा महाराष्ट्र आहे. विरोधकांकडून फसव्या योजना, विखारी अपप्रचार आणि पैशांचा पूर, तरी निकाल मात्र लोकसभेसारखाच लागणार. प्रश्न : मनोज जरांगे-पाटील तेच बोलतात, जे तुम्ही सांगता, हे खरे आहे काय? शरद पवार : त्यांची आपली भूमिका आहे. पण, त्यांची भूमिका व्यापक होत गेली आहे. जातीवर निवडणूक नेणार नाही, हे त्यांनी सांगितले. ते बौद्ध, मुस्लिम, लिंगायत, ओबीसी सर्वांविषयीच बोलत आहेत. त्यांचा दृष्टिकोन व्यापक होतोय. हे चांगले आहे.