सांगली : ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देत आहेत. वास्तव पाहिले तर लोकांना लोकांपासून तोडण्याचे व त्यांना मारण्याचे काम भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच केले आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगलीत केली.काँग्रेसचे सांगली विधानसभेचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ येथील नेमिनाथनगरच्या क्रीडांगणावर रविवारी सभा झाली. यावेळी कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील, आमदार विश्वजित कदम, कर्नाटकचे आमदार बी. आर. पाटील, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव काझी मोहम्मद निजामुद्दीन आदी उपस्थित होते.खरगे म्हणाले, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे विषारी साप आहेत. समाजात विष पेरण्याचे काम ते करतात. त्यामुळे या सापाला मारण्याशिवाय पर्याय नाही. योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे नेते घिरट्या घालत महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिरत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालके ठार झाली, तिकडे जायला योगी यांना वेळ नाही. मात्र महाराष्ट्रात ते प्रचार करीत फिरत आहेत. त्यांना कोल्हापूरसारख्या पुरोगामी शहरात येऊ कसे दिले? पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री हे मणिपूर जळत असताना त्याठिकाणी जायचे कष्ट घेत नाहीत. महाराष्ट्रात प्रचारासाठी मात्र, त्यांना पुरेसा वेळ आहे. विदेशात फिरायला पंतप्रधान जातात, पण देशात एक प्रांत जळतोय त्याची त्यांना काळजी नाही.
पंतप्रधान सांगतात त्यांचे अपयश‘एक है, तो सेफ है’ असा नारा पंतप्रधान देताहेत. म्हणजे त्यांच्या नेतृत्वात देशात एकी नाही. त्यांना देश एक ठेवण्यात अपयश आलेले आहे, हे त्यांनीच सिद्ध केले, अशी टीका खरगे यांनी केली.
तुमच्याकडे पैसा, आमच्याकडे जनता..एका आमदाराला पन्नास खोके देण्यात येत असतील, तर भाजपकडे किती पैसा आहे, याची कल्पना येईल. पण, त्यांच्याकडे पैसा असला, तर आमच्याकडे जनता आहे. आम्ही जनतेच्या जोरावर महाराष्ट्रातील सत्तेवरून त्यांना पायउतार व्हायला भाग पाडू, असे खरगे म्हणाले.
खरगे यांचे मराठीतून भाषण..खरगे यांनी हिंदीमधून भाषणास सुरुवात केली. शेवटची वीस मिनिटे त्यांनी उपस्थितांशी मराठीतून संभाषण केले. जे शब्द आठवत नव्हते ते विचारून मराठीतच भाषण पूर्ण केले.