यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीतील प्रत्येकी तीन पक्षांत जागावाटपाचा संघर्ष सध्या सुरू आहे त्याचा थेट संबंध निकालानंतर होणाऱ्या सरकार स्थापनेशी आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्रिपदाशी आहे. त्यामुळेच आपापल्या मित्रपक्षांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. किंग नाही तरी निदान किंगमेकर बनायचे असेल तर आधी जास्तीतजास्त जागा पदरात पाडून घेण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
निकालानंतर महायुती वा मविआ यापैकी एकाला बहुमत मिळाले तरी जागांच्या आकड्यांचा खेळ निर्णायक भूमिका बजावणार आहे. ज्याचे जास्त आमदार त्याला मुख्यमंत्रिपद असा फार्म्युला समोर येऊ शकतो. आता जास्त आमदार निवडून आणायचे असतील तर लढविण्यासाठी आधी जास्त जागा पदरी पाडून घेणे महत्त्वाचे आहे.
स्वबळावर कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकणार नाही हे स्पष्ट आहे, अशावेळी आपल्याशिवाय सरकार बनूच शकणार नाही, असा विचार समोर ठेवूनही रणनीती आखली जात आहे. दोनपैकी एका मित्रपक्षाच्या पाठिंब्याने सरकार स्थापना करता येण्यासारखी स्थिती आली तर एकाचवेळी दोन प्रादेशिक पक्षांवर अवलंबून राहण्याची गरज नसेल, असे राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना वाटते.
नंबर गेमसाठी धडपड
- कोणाला बहुमत मिळाले तरी आणि नाही मिळाले तरी काही उलथापालथी संभवतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
- अशा शक्य-अशक्यतांच्या परिस्थितीत ‘नंबर गेम’ हा आपल्या बाजूने असावा यासाठी आधी आवश्यक आहे ते अधिकाधिक जागा आपल्याकडे घेणे आणि त्यासाठीच विरोधकांना प्रचाराच्या आखाड्यात निपटविण्याच्या आधी मित्रपक्ष जागावाटपात एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत.
- बहुमताच्या परिस्थितीत अधिकाधिक मंत्रिपदेच नाहीत तर त्यापुढच्या विधान परिषद, राज्यसभेच्या जागा, विविध महामंडळांवरील नियुक्त्यांंसाठीही आकड्यांचा खेळ हा कळीचा मुद्दा असेल.
जागांची होणार तुलना
जागावाटप एकदा अंतिम झाले की, साहजिकच कोण किती जागा लढणार याची तुलना केली जाईल. भाजपची तुलना काँग्रेसशी, शरद पवार गटाची तुलना अजित पवार गटाशी आणि उद्धवसेनेची तुलना ही शिंदेसेनेला मिळालेल्या जागांशी होईल आणि कोण किती भारी ठरले ही तुलनादेखील साहजिकच होणार आहे.
प्रभावी वकिली आणि टाेकाचे वादविवाद
- जागावाटपाच्या चर्चेत विशिष्ट जागा आपलाच पक्ष कसा जिंकू शकतो यासाठी प्रभावीपणे वकिली केली जात आहे. जागावाटप बैठकांमध्ये टोकाचे वादविवाद झाल्याची माहिती मिळत आहे.
- मुख्यमंत्रिपद हा तर कळीचा मुद्दा आहेच शिवाय प्रत्येक पक्षाकडे असलेल्या आमदारांच्या अनुपातामध्ये मंत्रिपदे दिली जातील असेही ठरू शकते, हा मुद्दाही अधिक जागांच्या आग्रहामागे आहे.
- २०१९ च्या निकालात तेव्हाच्या भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते; पण शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सरकार आले. तेव्हापासून अशक्य वाटणारी राजकीय समीकरणे राज्यात घडत गेली. अडीच वर्षांनी शिवसेना तर त्याच्या एक वर्षाने राष्ट्रवादी फुटली. भाजप, फुटलेली शिवसेना आणि फुटलेली राष्ट्रवादी असे सरकार बनले.