Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला ठाकरे गटानेही प्रचारावर भर दिला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करत प्रचारसभा घेत आहेत. यातच सलग तिसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.
विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून नेत्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची तिसऱ्यांदा बॅग तपासण्यात आली. श्रीगोंदा येथे उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आल्या. यावेळीही उद्धव ठाकरे यांनी तपास करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांना रोखठोक प्रश्न विचारले.
तिसऱ्यांदा बॅगा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
श्रीगोंदा येथील हेलिपॅडवर उतरताच निवडणूक अधिकारी उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यासाठी आले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. बॅगा तपासायला आलात का, असा प्रश्न विचारला. तसेच यावेळी कॅमेरा हातात असलेल्या निवडणूक अधिकाऱ्याला कॅमेरा कोणता आहे, किती मेगापिक्सल आहे, किती फ्रेम पर सेकंड चालतो, असे नाना प्रश्न विचारून बुचकळ्यात टाकले. याशिवाय अन्य निवडणूक अधिकाऱ्यांची नावे, कुठे राहता, अशी चौकशी केली आणि आतापर्यंत किती नेत्यांच्या बॅगा तपासल्या, असा प्रश्नही केला. बाळासाहेब थोरात यांची बॅग तपासल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर सत्ताधारी पक्षांच्या कोणच्या बॅगा तपासल्या, अशी विचारणा केली. तेव्हा तेथे उपस्थित अधिकाऱ्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया आणि राधाकृष्ण विखो पाटील यांची बॅग तपासल्याचे सांगितले.
पैसे वगैरे काही मिळाले नाहीत ना, मग देताय का तुम्ही मला
यानंतर अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी केली. यानंतर पैसे वगैरे काही मिळाले नाहीत ना, मग देताय का तुम्ही मला, म्हणजे सर्टिफिकेट देताय का मला, अशी मिश्लिक टिप्पणी करत अधिकाऱ्यांची फिरकी घेतली. तसेच सगळ्यांना तपासा, ही लोकशाही आहे, पंतप्रधान मोदी यांनाही तपासले पाहिजे, त्यांना वेगळे काढता येणार नाही, अशी सूचना निवडणूक अधिकाऱ्यांना केली.
दरम्यान, वणी येथे ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी औसा येथील हेलिपॅडवर निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी केली. यानंतर कोकणातील दौऱ्यावेळी महाराष्ट्र-गोवा सीमेवर उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवण्यात आला. यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. याानंतर महायुतीतील नेत्यांनी आपल्याही बॅगा तपासल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले.